वॉर्डविझार्डतर्फे २०२२ च्या वर्षात ४३ हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री, गेल्या वर्षाच्या तुलनेत १३१ टक्क्यांची वाढ

93

वडोदरा, ३ जानेवारी २०२३ : विकासाच्या लाटेवर स्वार होत वॉर्डविझार्ड या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड जॉय ई बाइकच्या उत्पादक कंपनीने २०२२ च्या कॅलेंडर वर्षात (जानेवारी- डिसेंबर २०२२) विक्रीत १३१.६ टक्क्यांची वाढ नोंदवत नव्या वर्षात प्रवेश केला आहे. कंपनीने गेल्या कॅलेंडर वर्षाच्या तुलनेत ४३,९१४ इलेक्ट्रिक दुचाकी युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी आणि डिसेंबर २०२१ दरम्यान कंपनीने १८,९६३ युनिट्सची विक्री केली होती.

उत्पादनांना मिळत असलेली चांगली मागणी आणि देशभरात विस्तारलेले जाळे यांच्या जोरावर कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या ५४०० युनिट्सची विक्री करत ३९.८९ टक्क्यांचा दोन आकडी विकास साध्य केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये कंपनीने ३८६० इलेक्ट्रिक दुचाकी युनिट्सची विक्री केली होती.

या विकासाविषयी तसेच २०२३ वर्षाबद्दल वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले, ‘२०२२ चे कॅलेंडर वर्ष कंपनीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले, कारण या वर्षात कंपनीने विक्रीचे नवे विक्रम नोंदवले, नव्या क्षेत्रात प्रवेश केला तसेच जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले. आमची दमदार उत्पादन श्रेणी, अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा जगभरातील खरेदीदारांशी मेळ घातला गेला व पर्यायाने गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२२ च्या कॅलेंडर वर्षात तीन आकडी विकास साधणे शक्य झाले.

इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब वाढत असतानाच या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, जुन्या आव्हानांवर मात केली जाईल व अधिक दमदार विकास साधला जाईल अशी आमची अपेक्षा आहे. ग्राहकांसाठी उत्पादन श्रेणीचा आणखी विस्तार करण्याचे आम्ही ठरवले असून कंपनी २०२३ मध्ये नवी मॉडेल्स उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर या क्षेत्राचा समग्र विकास करण्यासाछी भारतातील पहिले ईव्ही क्लस्टरही विकसित केले जाणार आहे.’

आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीने या आर्थिक वर्षाच्या (एप्रिल ते डिसेंबर २०२२) पहिल्या तीन तिमाहींमध्ये ३० हजार पेक्षा जास्त (३०,४९३) इलेक्ट्रिक दुचाकी युनिट्सची विक्री केली असून गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत झालेल्या १७,३४० युनिट्स विक्रीच्या तुलनेत (एप्रिल ते डिसेंबर २०२२) यंदा ७५.८ टक्के विकास नोंदवला गेला आहे.