महाराष्ट्र भूषण पुरस्कारानिमित्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना होणारा विरोध योग्य कि अयोग्य ?
‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अध्यात्म, समाजप्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रांत केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने या पुरस्काराची घोषणा केली होती. तथापी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याला संभाजी ब्रिगेडने विरोध करून हा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासारख्या महनीय समाजसेवकाला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास संभाजी ब्रिगेडने विरोध करण्याचे कारण काय, याचा शोध घेतला पाहिजे.
पहिले ते ‘राज’कारण !
सध्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष आहे. त्यातील पहिला गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असून त्यांनी जाहीरपणे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गुरु मानलेले आहे. शिवसेनेचा दुसरा गट सध्या सत्ताहीन असून त्यांची संभाजी ब्रिगेड सोबत राजकीय युती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दुसर्या गटाला प्रसन्न करण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्काराला विरोध करण्याचे राजकारण सुरू आहे.
दुसरे ते ‘जात’कारण
जे जे ब्राह्मण जातीच्या व्यक्तींशी संबंधीत असेल, ते ते सर्व नाकारण्याचा, नष्ट करण्याचा चंग बांधून विरोध करायचा, हा एककलमी कार्यक्रम राबवणे स्थापनेपासून आतापर्यंत संभाजी ब्रिगेड संघटनेने सातत्याने चालू ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संभाजी ब्रिगेडने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला असावा, हे प्राथमिक दृष्ट्या कोणाच्याही लक्षात येईल.
तिसरे ते ‘समर्थ’कारण
गेली आठ दशके डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या परिवाराकडून दासबोधावरील श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचे कार्य चालू आहे. त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपर्यापर्यंतच नव्हे, तर देशभर आणि अनेक देशांत नियमित चालू आहेत. मुळात हा ‘दासबोध’ ग्रंथच समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेला आहे. ब्राह्मणद्वेषाची काविळ झालेल्या संभाजी ब्रिगेडला रामदासस्वामी ‘ब्राह्मण’ असल्याने नको असतात, त्यांचे चित्रही नको असते; मग त्यांच्या ‘दासबोध’ ग्रंथाचा प्रचार कसा चालेल ?
खरे ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
डॉ. आप्पासाहेब यांच्या बहुविध कार्याची यादी पुष्कळ मोठी आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतांनाच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी केलेले वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन याची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, स्मशानभूमींची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणे, यासह अनेक कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जातात. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कोकणातील आंग्री समाजाला साक्षर आणि निर्व्यसनी बनण्याचे महनीय कार्य केले आहे. ही डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ब्राह्मण जातीच्या पलीकडे जाऊन केलेली सर्व जातबांधवांची सेवा नव्हे का ? त्यांचा लोकसंग्रह विलक्षण मोठा आहे. २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी मृत्योत्तर महाराष्ट्र भूषण दिला, तो डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वीकारला होता. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉड्र्स’मध्ये नोंद करण्यात आली होती.
हे सर्व लिहिण्याचे कारण प्रेरणादायी कार्य आणि व्यक्तीमत्त्वे यांना जातीच्या आधारावर होणारा विरोध, हा या पवित्र महाराष्ट्रभूमीसाठी भूषणावह नाही ! अशा जात्यंधांना रोखण्यासाठी संविधानप्रेमी समाज पुढे का येत नाही, हाच खरा प्रश्न आहे ?
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था