पुणे, ८ डिसेंबर, २०२२ : आजकाल आयुर्मान वाढले आहे तसे दीर्घकाळ म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षानंतरही नोकरी, व्यवसायाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ होत आहे. आजकाल मोठ्या प्रमाणात लोक वयाच्या साठीनंतरही काम करत असल्याचे दिसते. अनेक देशांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वयही वाढवले आहे.
याचप्रमाणे वाढते आयुर्मान लक्षात घेऊन आयुर्विमा कंपन्यांनी वयाच्या ६०, ७० वर्षेच नव्हे तर अगदी ७५ वर्षांच्या पुढेही विमा संरक्षण सुरू राहील अशा मुदत विमा योजना आणल्या आहेत. मात्र अनेक लोकांना वयाच्या ६० नंतर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षणाची गरज आहे, असे वाटत नाही, त्यामुळे ते दीर्घकालीन मुदत विमा योजना खरेदी करण्यास उत्सुक नसतात. ही बाब लक्षात आल्यानंतर विमा कंपन्यांनी एक अनोखी योजना सादर केली आहे. ती म्हणजे ‘शून्य खर्च’ मुदत विमा योजना.
यात पॉलिसी मुदतीआधी बंद करता येते, मात्र त्यात ग्राहकाचे आणि कंपनीचेही नुकसान होते. यावर उपाय म्हणून विमा कंपन्यांनी एक अभिनव उपाय योजला आहे. तो म्हणजे अशी दीर्घकालीन मुदतविमा योजना घेतल्यानंतर पॉलिसीधारकाला ती लवकर बंद करण्याची इच्छा झाली तर त्याला त्याने भरलेला अधिकचा प्रीमियम (व्याजाशिवाय) परत केला जातो. म्हणजे पॉलिसीधारकाने वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंतचा मुदत विमा (टर्म कव्हर) घेतला असेल, तर त्याला त्यानुसार प्रीमियम भरावा लागतो.
हा प्रीमियम वयाच्या ६० व्या वर्षी मुदत संपणाऱ्या पॉलिसीच्या तुलनेत जास्त असतो. मात्र कालांतराने अशी दीर्घकालीन पॉलिसी घेतलेल्या पॉलिसीधारकाने वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्ती घेतली तर कदाचित त्यांना तो प्रिमीयम भरणे शक्य होणार नाही. किंवा त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, आर्थिक गरजांसाठी पॉलिसीधारकांवर अवलंबून नसेल तर, इतक्या दीर्घ मुदतीच्या विम्याची गरज नाही, असेही पॉलिसीधारकाला वाटू शकेल. अशावेळी ते ही पॉलिसी मुदतीआधी बंद करू शकतात.
तेव्हा कंपनी त्यांनी दीर्घ मुदतीच्या योजनेच्या हिशेबाने भरलेला अधिकचा प्रीमियम परत देईल. विमा व्यवसायाच्या इतिहासात प्रथमच विमा कंपन्या प्रीमियम परत देत असून, अशी लवचिकता असणारी ही पहिलीच अनोखी मुदतविमा पॉलिसी आहे,” अशी माहिती पॉलिसी बझार व्यवसाय प्रमुख (टर्म लाइफ इन्शुरन्स) सज्जा प्रवीण चौधरी यांनी दिली.
बजाज अलियान्झ लाइफ, मॅक्स लाइफ आणि एचडीएफसी लाईफ या कंपन्यांनी अशा पॉलिसी दाखल केल्या असून, इतर आयुर्विमा कंपन्या त्यावर काम करत आहेत.