पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्य गावागावापर्यंत पोचविण्याबरोबरच, समितीतील विद्यार्थ्यांना समाजात वावरण्यासाठी आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या दिवाळी निधी संकलन योजनेतील निधी समर्पण सोहळा शनिवारी (ता. ७) झाला. विद्यार्थ्यांनी जमवलेला १८ लाख रुपये निधी समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात समितीकडे सुपूर्त करण्यात आला.
ग्रामीण भागातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांची अत्यल्प दरात निवास- भोजनाची सोय करत विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर बनविणे, हे विद्यार्थी साहाय्यक समितीचे उद्दिष्ट आहे. दिवाळी निधी संकलन योजना हा त्याचाच एक भाग असून, समितीचे विद्यार्थी दिवाळीच्या सुटीत घरी जातात, तेव्हा निधी संकलनासाठी त्यांच्याकडे पावती पुस्तके दिली जातात. ज्यात प्रत्येकी १०० रुपयांच्या २० पावत्या असतात. समितीसाठी निधी जमविणे, हा त्यामागील एकमेव हेतू नसून आपण जेथे राहतो, त्या समितीची माहिती, तिचे कार्य विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यावे आणि ते आपल्या गावातील, अगदी वाडीवस्तीवरील लोकांपर्यंत पोचवावे. त्यातून समितीची माहिती गावातील लोकांपर्यंत पोचेल आणि भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर निधी संकलनाच्या निमित्ताने गावातील लोकांबरोबर संवाद साधण्याची, आपले मत समोरच्याला पटवून देण्याची धिटाई विद्यार्थ्यांमध्ये येईल. समितीचे हे दोन्ही हेतू साध्य करत यंदा समितीच्या वसतिगृहात राहणाऱ्या ७०० विद्यार्थ्यांनी सुमारे १८ लाखांचा निधी संकलित केला.
आपण दिलेल्या निधीचा योग्य विनियोग होत असल्याची खात्री पटली, तर समाजातील अनेक हात मदतीसाठी पुढे येतात, गावातील केवळ प्रतिष्ठित व्यक्ती, राजकारणीच नाही तर सामान्यातील सामान्य व्यक्तीनेही या योजनेत निधी दिल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. समितीत आम्हाला केवळ निवास- भोजन सुविधा नाही तर संस्कारही मिळतात, आमच्या सर्वांगिण विकासासाठी समिती प्रयत्नशील असते. समितीसाठी आमच्याकडून फूल ना फुलाची पाकळी या स्वरुपात काम केल्याने वेगळी ऊर्जा मिळाली, अशी प्रतिक्रियाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या योजने चांगले काम केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
——————————
विद्यार्थ्यांना संवादी बनविणे आणि समितीच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेणे, या विचारांतून गेली ३० वर्षे ही योजना सुरू आहे. यावर्षी पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले, यामुळे सर्वाधिक १८ लाख रुपयांचा निधी जमा झाला.
– तुकाराम गायकवाड, कार्यकारी विश्वस्त, विद्यार्थी साहाय्यक समिती