वानखेडेमध्ये शाहरुखला अडवणाऱ्या विकास दळवींचं पुढं काय झालं?

948

तारीख होती १६ मे २०१२. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल रंगात आली होती. मुंबई इंडियन्सच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना पार पडला. त्या मॅचमध्ये काय झालं हा प्रश्न तुम्ही कट्टर आयपीएल फॅनला विचारला, तरी त्या भिडूला विचार करत बसावं लागेल. पण हा त्या मॅचनंतर काय झालं, याचं उत्तर मात्र लगेच मिळेल.

कोलकात्यानं मुंबईला हरवल्यानंतर, त्यांच्या चाहत्यांनी मैदानात जल्लोष करायला सुरुवात केली. टीमचा सहमालक आणि अभिनेता शाहरुख खानसह काही लहान मुलंही या जल्लोषात सामील झाली. यातल्या काही जणांनी मैदानात येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षारक्षक विकास दळवी यांनी त्यांना अडवलं.

शाहरुख खान आणि विकास दळवी यांची बाचाबाची झाली आणि त्याचा फोटो व्हायरल झाला.

शाहरुखनं दारू पिऊन हुज्जत घातल्याचा आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप मुंबई क्रिकेट असोसिएशननं केला. शाहरुख विरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शाहरुखवर पाच वर्षांसाठी वानखेडे स्टेडियममध्ये येण्यास बंदी घालण्यात आली.

या सगळ्या प्रकरणात सुरक्षारक्षक विकास दळवी चांगलेच लोकप्रिय झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शाहरुखसमोर न डगमगल्यानं आणि मराठीत बोलल्यानं दळवी यांचा सत्कार करण्याचं जाहीर केलं होतं.

मीडियामध्ये या प्रकरणाची चर्चा शीगेला पोहोचली आणि दळवी यांना त्याचा चांगलाच त्रास झाला. या प्रकरणानंतर काही दिवस ते शहर सोडून गेले. मीडियानं त्यांचा चांगलाच पिच्छा पुरवला.

त्यावेळी एका वृत्तपत्राशी बोलताना दळवी यांनी, ‘त्या घटनेपासून मी आणि माझं कुटुंब नीट झोपलेलो नाही. मी अत्यंत निराश आहे. मीडियाला माझ्या गोपनीयतेचा आदर नाही. माझा मुलगा अजूनही लहान आहे आणि अशा परिस्थितीत मी त्यांच्या संरक्षणासाठी आजूबाजूलाही नाही. मुलं स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना, जे माझं काम आहे ते मी करत होतो. पण मीडिया मात्र मी गुन्हेगार असल्याप्रमाणं माझा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी गुन्हा केलाय की नाही हे पोलीस ठरवतील.’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

शाहरुखनं आपण शिवीगाळ केली नाही व पदाधिकाऱ्यांशी हुज्जतही घातली नाही असं सांगितलं. पुढे तपासात शाहरुखनं मद्यपान न केल्याचं निष्पन्न झालं. मुंबई क्रिकेट असोसिएशननं २०१५ मध्ये त्याच्यावरची बंदीही उठवली.

मीडियाही काही वर्षांनी हे प्रकरण विसरून गेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दळवी यांचा सत्कार केल्याची बातमी कुठेही मिळाली नाही, ना या प्रकरणानंतर दळवी कधी बातम्यांमध्ये दिसले. त्यांच्या वाटेला फक्त मनस्ताप, पोलिस स्टेशनच्या वाऱ्या आणि दडपण आलं.