“वनराई करंडक” प्राथमिक फेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद…अंतिम फेरी २३ जानेवारीला…

92

वनराई पर्यावरण वाहिनी आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत होणार २० संघांचे सादरीकरण… 

पुणे, दि. २३ जानेवारी : “वनराई करंडक”च्या निमित्ताने पृथ्वी संरक्षण व संवर्धन, जल तसेच भूजल संवर्धन, झाडे लावा-झाडे जगवा यासह जलप्रदुषण, वायुप्रदुषण, ध्वनीप्रदुषण आणि प्लास्टीक प्रदुषण अनेक विषय घेऊन त्यावर उपाय आणि जनजाग्रृतीपर विविध शाळांमधील विद्यार्थी सादरीकरणासाठी सज्ज झालेत.  नुकतीच या स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली असून अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ सोमवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २:०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे अशोक बेहेरे , बालकलाकार आर्या घारे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त रोहिदास मोरे, धान्याकुमार चोरडिया, सचिव अमित वाडेकर, वनराई पर्यावरण वाहिनी प्रकल्प संचालक भारत साबळे उपस्थितीत असणार आहेत.

“वनराई करंडक” प्राथमिक फेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद...अंतिम फेरी २३ जानेवारीला..

यंदा “वनराई करंडकाचे” २० वे वर्ष आहे. सिंहगड रोड येथील सानेगुरुजी स्मारक स्व. निळू फुले सभागृह येथे करंडकाची प्राथमिक फेरी झाली होती. यंदाच्या स्पर्धेत ३० शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामधील १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण असणार आहेत. पर्यावरण जनजागृती संबंधी नाटिका, गायन-नृत्य सादरीकरण हा “वनराई करंडकाचा” मुळ उद्देश आहे.  नाटिका, गीत, पर्यावरण संदेश, समुह नृत्याविष्कार, काव्य व संगीत या निकषांच्या आधारे स्पर्धेचे मुल्यांकन होते.

वनराई संस्थेच्या वतीने पुण्यातील शाळांसाठी वनराई पर्यावरण वाहिनी अंतर्गत वनराई करंडक दरवर्षी आयोजीत केला जातो. गेली १९ वर्ष या करंडकाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश वनराईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिला जात  आहे. विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार घडावे, पर्यावरणाविषयी त्यांच्यात प्रेम निर्माण व्हावे यासाठी हा करंडक दरवर्षी पुण्यामध्ये आयोजित केला जातो. यामध्ये पुण्यातील असंख्य शाळा सहभागी होतात.