‘लॉ ऑफ लव्ह’ या हिंदी सिनेमाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित…

22

प्रेम कधीही जाती-पातीच्या बंधनात अडकत नाही, धर्म आणि राजकारणाच्या सीमारेषा कधीही प्रेमाला बांधू शकत नाहीत, अंतरंगातून उमलतं ते खरं प्रेम अशी वेगवेगळ्या प्रकारे प्रेमाची व्याख्या आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये मांडण्यात आली आहे. प्रेमाचे विविध पैलू बऱ्याच दिग्दर्शकांनी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही प्रेम ही भावनाच अशी आहे ज्यावर नेहमीच नवनवीन चित्रपट बनत असतात. ‘लॉ ऑफ लव्ह’ हा आगामी हिंदी चित्रपटही प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. २६ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

निर्माते जे. उदय यांनी वेदिका फिल्म क्रियेशन या बॅनरखाली ‘लॉ ऑफ लव्ह’ या चित्रपटाची निर्मिती केली असून, कथा-पटकथा लेखनासोबतच दिग्दर्शनही केलं आहे. या चित्रपटाद्वारे जे. उदय हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. ‘लॉ ऑफ लव्ह’ मध्ये काय पहायला मिळेल याची झलक ट्रेलरमध्ये आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी म्हणून ओळखली जाणारी मराठी सिनेसृष्टी आज झगमगाटाच्या बाबतीत काहीशी मागे असली तरी जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये कायम आघाडीवर आहे. सध्या दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला असून, पॅन इंडिया प्रदर्शित होणारे साऊथचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालत आहेत. या शर्यतीत मराठी सिनेमेही उतरले आहेत. ‘लॉ ऑफ लव्ह’ हा आगामी चित्रपटही पॅन इंडिया रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘लॉ ऑफ लव्ह’विषयी जे. उदय म्हणाले की, या चित्रपटाची कथा ८०-९०च्या दशकातील आहे. प्रेमाचा एक कायदा असतो हे तेव्हा दशकातील तरुणाईला माहित नव्हतं. प्रेमाचा एक कायदा असून, त्याचा तरुण पिढीवर कसा चांगला-वाईट परिणाम होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलं असल्याचं उदय म्हणाले.

 हे हि वाचा : तुम्हाला YOUTUBE वरील ADS चा त्रास होतो? अशा प्रकारे करा ब्लॉक; काही मिनिटांत होईल सुटका

मोहन जोशी, यतीन कार्येकर, शाल्वी शाह, प्राची पालवे, अनिल नगरकर यांनी ‘लॉ ऑफ लव्ह’मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटात प्रेमामधील वेडेपणा आणि प्रासंगिक विनोदांचा संगम अनुभवायला मिळेल. धडाकेबाज अॅक्शन आणि रोमान्सचा समावेश असलेला हा सिनेमा कुटुंबाबरोबर पाहण्याजोगा आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवाद, अफलातून अभिनय, सुमधूर गीत-संगीत, मुद्देसूद मांडणी, लक्षवेधी दिग्दर्शन असलेला हा परिपूर्ण मनोरंजक चित्रपट कुटूंबाबरोबर एंजॉय करता येईल अशी हमीही जे. उदय यांनी दिली आहे.