लग्नानंतर अनैतिक संबंधात आला पैसा, प्रेयसीच्या एका हट्टामुळे रंगला खूनी खेळ

247

नाशिक | दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या खुनाचा पोलिसांकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पूजा आखाडे असं विवाहित महिलेचं नाव आहे. दोन दिवसांआधी पूजाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यासंबंधी तपास केला असता पोलिसांना हादरून सोडणारी माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या म्हसरुळ भागात झालेल्या विवाहित महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं. प्रियकरानेच आर्थिक देवाण घेवाण आणि संशयातून हा खून केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 20 जानेवारीला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मखमलाबाद रोडवर पूजा आखाडे या महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत आणि धारदार शस्त्राने वार केलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला होता.

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु असतांनाच मोरे मळ्यात राहणाऱ्या सागर भास्कर या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यावेळी त्याने खूनाची कबुली दिली. सागर आणि पूजा यांचे अनैतिक संबंध होते. सागरला पैशांची गरज असल्याने पूजाने त्याला 80 हजार रूपये दिले होते.

मात्र, लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने तो ते पैसे परत करू शकला नाही. पैशांसाठी पूजा वारंवार त्याच्याकडे तगादा लावत असल्याने रागाच्या भरात त्याने त्या रात्री पूजाच्या मानेवर, पोटावर चाकूने सपासप वार करत तिचा खून केला. खरंतर, नात्यामध्ये पैसा आल्याने खुनाचा असा धक्कादायक प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.