राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रांट यांची निवड

73

पुणे : भारत सरकार संचालित राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रांट यांची निवड झाली आहे. डॉ. ग्रांट यांचे वैद्यकीय आणि सामाजिक कार्यातील भरीव योगदान लक्षात घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांनी नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र दिले.

आयोगाच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल डॉ. ग्रांट यांचा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारूवाला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून अल्पसंख्याक समाजाची उन्नती, आरोग्यसेवेचे अत्याधुनिकरण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून पुण्याला ओळख मिळवून देण्याचे उद्दिष्ट्य डॉ. ग्रांट यांनी ठेवले आहे. सर्वसमावेशक आणि समाजहिताचे काम करण्याचे ध्येय आजवर रुबी हॉल क्लिनिकने जपले असून, त्याच ध्येयाने प्रेरित यापुढेही काम सुरु ठेवणार असल्याचा विश्वास डॉ. ग्रांट यांनी सत्कारावेळी व्यक्त केला. यावेळी अल्पसंख्याक समुदायातील समीर पठाण आणि अझीम गोडकूवाला यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, “राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागारपदी काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझा ठाम विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी आणि भरभराटीसाठी समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. जैन, शीख, पारसी आणि मुस्लिम यासह इतर अल्पसंख्याक समुदायाच्या समस्या सोडविण्यावर, त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या संधी, कौशल्य विकासाचे कार्यक्रम, उद्योजकता विकासाचे उपक्रम राबविण्यावर भर देणार आहे. पारसी समाजातील अनेक अनिष्ट रूढी, परंपरा दूर करण्याचा प्रयत्न करणार असून, पारसी अग्यारी मध्ये महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी पुढाकार घेणार आहे.”

“पुण्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, प्रतिभावान लोकांचे शहर आहे. पुणे शहरातील क्षमतेचा व येथील अल्पसंख्याक समाजाचा मेळ घालून त्यांचे सक्षमीकरण व त्यांच्यासाठीच्या योजनांवर भर दिला जाणार आहे. या प्रतिभेचा उपयोग करत येथे मोठ्या प्रमाणावर संधींची निर्मिती, तसेच आर्थिक विकासात प्रगती होण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. शहराचे सुशोभीकरण, अतिक्रमण मुक्त व खड्डे मुक्त शहर आणि बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्यासह वैद्यकीय पर्यटनासाठी पुण्याला जागतिक स्थळ म्हणून ओळख देण्यावर माझा भर असणार आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा व पायाभूत सुविधा असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठी लवकरच ‘सायबरनाइफ’चा समावेश करण्यात येणार असून, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रूग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याला प्राधान्य देणार आहोत,” असेही डॉ. ग्रांट यांनी नमूद केले.

अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल, तसेच सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल डॉ. परवेज ग्रांट यांनी मोदींच्या कार्याची प्रशंसा केली. स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत यासह विदेशी धोरण कार्यक्रमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन दिले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्येही आम्ही सर्वंकष आरोग्यावर भर देत असून, बालकांच्या हृदयविकारावर मोफत उपचार करत आहोत. तसेच वर्षाला २० कोटीहून अधिक निधी आर्थिक मागास वर्गातील रुग्णांसाठी खर्च करतो. मला खात्री आहे की, सरकारच्या साथीने यामध्ये आणखीन प्रभावी काम करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतील.

डॉ. ग्रांट यांच्या निवडीबद्दल अली दारूवाला यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. ग्रांट यांच्या नियुक्तीच्या रूपाने भारत सरकारच्या सर्वसमावेशक व प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. डॉ. ग्रांट यांची अल्पसंख्याक आयोगावर निवड झाल्याने सामाजिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यांच्यातील नेतृत्वगुण, अनुभव आणि सामाजिक कार्याप्रती त्यांची वचनबद्धता अल्पसंख्याक समुदायाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण ठरेल. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी त्यांची निवड सार्थ ठरेल, असे मत अली दारूवाला यांनी व्यक्त केले.