राज्यात उष्णतेचा कहर; जळगावमध्ये सर्वाधिक तापमान, जाणून घ्या पुण्याची स्थिती

164

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून शुक्रवारी (दि.१२) व शनिवारी (दि. १३) नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहणार असून भारतीय हवामान विभागाने येथे यलो अलर्ट जाहीर केला आहे. गुरुवारी (दि.११) राज्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान जळगाव येथे नोंदविण्यात आले आहे.

काही जिल्ह्यांतील तापमान

जळगाव ४४.८, मालेगाव ४३.६, अकोला ४३, वर्धा ४३, जालना ४२.८, नांदेड ४२.८, परभणी ४२.६, बीड ४१.९, सोलापूर ४१.५, अमरावती ४१.४, नागपूर ४१.३, चंद्रपूर ४१.२, बुलडाणा ४१, यवतमाळ ४१, गोंदिया ४१, नाशिक ४०.७, धाराशिव ४०.६, वाशिम ४०.४, सातारा ३९.३, पुणे ३८.८, सांगली ३८.५, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्वर ३३.५, रत्नागिरी ३४.४.

मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून उष्णता वाढू लागली आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांतील पारा चाळीशीपार होता. नाशकात पारा ४०.७ तर मालेगावात ४३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गुरुवारी जळगाव, मुंबई, ठाणे, अकोला, वर्धा, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या चटयाने नागरिक हैराण झाले. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात १० मेपासून ढगाळ वातावरण आहे.

ही काळजी घ्या

तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या हलया रंगाचे वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा * घराबाहेर असेल तर टोपी, छत्रीचा वापर करा * डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगलचा वापर करा * ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची विशेष काळजी घ्या * पंखे वापरा, ओलसर कपडे घाला आणि थंड पाण्याने वारंवार अंघोळ करा * सकाळी १० ते सायंकाळी पाच घराबाहेर पडणे टाळा * ओआरएस, लिंबू सरबत थोड्या थोड्या वेळेने घेत राहा

तसेच कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने झालेल्या वाढीमुळे आर्द्रता व उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवण्याची शयता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. मोचा चक्रीवादळाचे पोर्टब्लेअर पासून सुमारे ५०० किलोमिटरवर अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शयता आहे.