राज्यपाल बैस, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते  सुदर्शन केमिकल्सला ‘सीएसआर अवॉर्ड-२०२३’ प्रदान

61

पुणे : राज्यपाल बैस, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते  सुदर्शन केमिकल्सला ‘सीएसआर अवॉर्ड-२०२३’ प्रदान सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण क्षेत्रात सीएसआरच्या माध्यमातून भरीव योगदान दिल्याबद्दल सुदर्शन केमिकल्सचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘सीएसआर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. सुदर्शन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मुंबईतील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, हिंदुजा ग्रुपचे चेअरमन शोम हिंदुजा आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात आले.

जेश राठी म्हणाले, “हा सन्मान ‘सीएसआर’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. सुदर्शन केमिकल्स ‘सीएसआर’च्या माध्यमातून रोहा व महाड या उत्पादन केंद्रांसह सुतारवाडीतील संशोधन व विकास केंद्र आणि पुण्यातील मुख्य कार्यालयाच्या अवतीभवतीच्या दुर्गम भागामध्ये विविध प्रकल्प राबवत आहे. आजपर्यंत २५ गावांतील १५ हजार कुटुंबांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. महिला सक्षमीकरण अंतर्गत दहा वर्षांपासून कागदी पिशवी बनवण्याचे काम होत असून, ३०० महिलांना रोजगार मिळत आहे. सात राज्यात या पिशव्यांचा पुरवठा होत असून, आजवर पाच कोटी कागदी पिशव्यांची निर्मिती केली आहे. २०० महिलांना शिवणकाम प्रशिक्षण दिले. या महिला पुण्यात विविध ठिकाणी स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. सुदर्शन केमिकल्सने तीनही शिफ्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सामावून घेत आदर्श घालून दिला आहे.

आदर्श गाव प्रकल्प १५ गावांमध्ये राबविला जात असून, त्यातील तीन गावांना राज्य सरकारकडून संत गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. आठ ग्रामपंचायती, बारा जिल्हा परिषद शाळा व ११ अंगणवाडींना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. तळाघर येथील जिल्हा परिषद शाळेस महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रायगडमधील रोहा, महाड आणि मुळशीतील सुतारवाडी येथे सुदर्शनने कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात ७ हजार कुटुंबे जोडलेली आहेत. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाला सुदर्शन ‘सीएसआर’च्या माध्यमातून व्हेंटिलेटर व अन्य वैद्यकीय उपकरणे देण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात पाच हजार कुटुंबांना आधार दिला, असेही राजेश राठी यांनी नमूद केले.

राजेश राठी यांच्यासह आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. नीरजा बिर्ला, बजाज फाउंडेशनचे अपूर्व बजाज, गोदरेंज इंडस्ट्रीजचे नादीर गोदरेज, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनचे विजय गुरुनानी, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, भारतीय आयुर्विमा मंडळ, महिंद्रा ग्रुप, घोडावत ग्रुप, मालपाणी ग्रुप, कोहिनूर ग्रुप आदी संस्थांना समाजकार्यातील भरीव योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.