पुणे- भारताची 4500 कि.मी. सीमा बांगलादेशाशी जोडलेली आहे. सिलिगुरी कॉरिडॉरमध्ये घुसखोरी करून ईशान्य भारत मुसलमान बहुल करण्याचे प्रयत्न भारताच्या स्वातंत्र्यापासून चालू आहेत. आसामचे स्वातंत्र्यसैनिक आणि पूर्व मुख्यमंत्री गोपीनाथ बोर्डोलोई यांनी ईशान्य भारताचा प्रदेश पाकिस्तानला देण्याच्या विरोधात लढा उभा केला. त्यामुळे आज ईशान्य भारताची 7 राज्ये भारताचा भाग आहेत. आज संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रातही लाखो बांगलादेशी आहेत. राजकीय इच्छाशक्ती आणि कठोर अंमलबजावणी केल्यास बांगलादेशी घुसखोरीचा हा कर्करोग समूळ नष्ट होऊ शकतो, असे परखड प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. दिनांक 14 एप्रिल या दिवशी येथील इंद्रप्रस्थ कार्यालय येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ते बोलत होते. शंखनाद आणि वेदमंत्रपठणाने कार्यक्रमाला आरंभ झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत सद्गुरू सुश्री स्वाती खाडये, पू. मनीषा पाठक, आणि कोकण, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री मनोज खाडये, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, डॉ निलेश लोणकर, हिंदु जनजागृती समितीच्या सातारा जिल्हा समन्वयक सौ भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री सुनील घनवट, अधिवक्ता निलेश सांगोलकर, श्री रवींद्र पडवळ इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज, ह.भ.प. सुभाष बडदे, विश्वहिंदू परिषदेचे श्री महेंद्र देवी, श्री श्री रविशंकर प्रतिष्ठानचे शेखर मुंदडा, गोसेवा परिषदेचे राजेंद्र लुंकड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अधिवेशनाचा उद्देश समितीचे श्री. पराग गोखले यांनी मांडला.
यावेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील 125 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी गटचर्चेच्या माध्यमातून हिंदूंच्या संघटनासाठी व्याख्यानांचे आयोजन, धर्मप्रेमींच्या बैठका, आंदोलन, धर्मशिक्षण वर्ग अशा विविध माध्यमांतून हिंदुत्वाचा जागर करण्याचे निश्चित करण्यात आले.
2025 ला संपूर्ण विश्वात हिंदुराष्ट्र येणारच आहे. त्यासाठी ईश्वरी अधिष्ठान हवे. यासाठी साधना करून आपण सिंहाचा वाटा उचलूया असे मार्गदर्शन सद्गुरू स्वाती खाडये यांनी केले. तर हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन श्री विद्याधर नारगोलकर यांनी केले. यावेळी बोलताना श्री मनोज खाडये म्हणाले की, संघटित लढा का हवा? तर इंटरनॅशनल मिशनरी संघटना मोठ्या प्रमाणात करत असलेले धर्मांतरण, वक्फ बोर्डाला दिलेले पाशवी अधिकार, हलाल जिहाद या सर्वांपासून आपल्या धर्माचे रक्षण करायचे असेल तर एक समानसूत्री कार्यक्रम सर्व हिंदुत्ववादी संघटनांना तयार करून अवलंबावा लागेल. गेल्या 11 वर्षात 450 संघटनांना एकत्रित करून कार्य करायला आरंभ झाला आहे. प्रभावी जनजागृती करून सामान्य हिंदूंना त्यात सहभागी व्हावेसे वाटेल असा लढा या प्रांतीय अधिवेशनाच्या माध्यमातून उभा करायचा आहे.