९ जानेवारीपासून तरुणाईच्या प्रेमाचा गंध महाराष्ट्रभर
मुंबई ९ जानेवारी, २०२३ : प्रत्येक गोष्टीची सुरुवात हि सकारात्मक नसू शकते. अगदी तसंच प्रत्येक प्रेमकथेचा आरंभ हा गोड होतोच असे नाही. असं म्हणतात एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची आणि भिन्न विचारसरणीची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. पण प्रेमात द्वेषाला सुद्धा मात देण्याची ताकद असते. कधी कधी आपल्या मनामध्ये गैरसमजुतीचं जाळं असतं आणि ते काही केल्या दूर होत नाही पण जेव्हा होतं तेव्हा एकतर वेळ निघून गेलेली असती किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे का अशी परिस्थिती उभी राहते. पहिल्या नजरेत आपल्याला जशी एखादी व्यक्ती दिसते ती तशी असेलच असं काही सांगता येत नाही. अगदी तसंच होणार आहे सावी आणि रमाच… कलर्स मराठी घेऊन येत आहे अश्या दोन नायिकांची कथा ज्यांचे स्वभाव, राहणीमान आणि विचार अतिशय वेगळे आहेत. एक मनमोकळी आहे तर एक बेधडक एक जरा उद्धट आहे तर एक स्पष्टवक्ती. दोघींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि व्याख्या वेगळी आहे. जेव्हा या मुलींच्या आयुष्यात त्यांच्याहून वेगळ्या स्वभावाच्या दोन व्यक्ती येतील तेव्हा त्यांचं आयुष्य किती बदलेल ? ज्यांची ओळखच मुळात गैरसमजुती मधून झाली आहे त्यांच्यात प्रेम कसं फुलेल ? पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात. आता द्वेषाच्या आभाळावर सावी आणि अर्जुनचं प्रेम कसं फुलेलं ? लवकरच कळेल. सावी आणि अर्जुन या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा जिथे गैरसमजाचा निखाराच पेटवणार पिरतीचा वनवा “पिरतीचा वनवा उरी पेटला” रात्री १० वा. तर पैजेवर जग जिंकणारी ‘रमा’ आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा ‘राघव’ यांची खट्याळ प्रेमाची ‘तिखटगोड’ गोष्ट “रमा राघव” रात्री ९.०० वा. येत आहेत आपल्या भेटीला कलर्स मराठीवर. ९ जानेवारीपासून तरुणाईच्या प्रेमाचा गंध महाराष्ट्रभर पसरणार हे नक्की.
पिरतीचा वनवा उरी पेटला चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली असून सावीची भूमिका रसिका वखारकर आणि अर्जुनची भूमिका इंद्रनील कामत साकारणार आहेत. रामा राघव रोहिणी निनावे लिखित मालिकेची निर्मिती क्रिएटिव्ह ट्रान्समीडिया यांनी केली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या शेटेचा तिखट अंदाज तर अभिनेता निखिल दामलेचा प्रसन्न गोडवा यामुळे खट्याळ प्रेमाची ही ‘तिखटगोड’ गोष्ट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या धमाल युवा जोडीबरोबरच सुहिता थत्ते,गौतम जोगळेकर,शीतल क्षीरसागर,सई रानडे,प्राजक्ता केळकर,अर्चना निपाणीकर,राजन जोशी, कांचन पगारे अशी भली मोठी स्टार कास्ट या मालिकेत असल्यामुळे ही मालिका तरुण पिढी बरोबरच आबालवृद्धांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.
पैजेवर जग जिंकणारी ‘रमा’ आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा ‘राघव’ यांची खट्याळ जोडी कलर्स मराठीवरच्या ‘रमा राघव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दोन अतिशय विरुद्ध कौटुंबिक वातावरणातून आलेल्या रमा आणि राघव यांच्यातील संघर्षाची आणि त्यातून पुढे फुलणाऱ्या प्रेमाची ही तिखट गोड गोष्ट आहे. संस्कार ,संस्कृती, परिश्रम याशिवाय आयुष्यात काही मिळत नसतं याची शिकवण अंगी भिनलेला राघव तर पैशांनी काहीही विकत घेता येतं आणि अशक्य असे काही नसते असा विचार करणारी, अहंकारी रमा यांचा सामना होतो..आणि या भांडणातूनच प्रेम फुलायला लागतं. आयुष्यात आदर्श, तत्व, मूल्य यांचं महत्व नवीन पिढीला हलक्या फुलक्या रीतिने पटवून देण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जाणार आहे.
“पिरतीचा वनवा उरी पेटला” मालिकेतील आपली सावी आत्ताच्या पिढीतील मनमोकळी अशी मुलगी आहे. सावी जरी चोरी करत असली तरीदेखील आपल्याकडून कुठल्याही चांगल्या आणि गरीब माणसाला लुटलं जाऊ नाही असं तिचं सूत्र आहे. ज्या शाळेसाठी तिनं आयुष्यात पहिल्यांदा चोरी केली ती शाळा आपल्या पायावर उभी राहावी अशी तिची इच्छा आहे. सावीचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे या गोष्टीशी अनभिज्ञ सावी कवठेभैरव गावात येते. आणि तिथे तिची भेट अर्जुनशी होते. अर्जुन गावातील मोठं प्रस्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्जुन अतिशय तिरसट, संयमी, धोरणी पण तापट, दिलदार पण खुनशी आहे. तो त्या गावातला एक कर्तबगार तरुण आहे. त्याने घर, व्यवसाय आणि घरातला कारभार सांभाळला आणि सगळ्यांना आपल्या टाचेखाली आणलं. आता जेव्हा सावी आणि अर्जुन भेटतील तेव्हा यांच्या प्रेमकथेचा करार कसा रंगेल ? लग्नाच्या नात्यात अडकून कोणाला फसवणं सावीला मान्य नाही आणि लग्न या बंधनावर अर्जुनचा विश्वास नाही. पण असं काय घडतं कि कि दोघे एक बंधनात अडकतात ? असं कुठलं सत्य आहे जे अजून सावीला माहिती नाहीये ? हळूहळू सगळ्याचा उलघडा होईलच.
व्यवसाय प्रमुख कलर्स मराठी अनिकेत जोशी म्हणाले, “आपण याआधी देखील अनेक प्रेमकथा पहिल्या आहेत मग ती वैचारिक तफावतमधून निर्माण झालेली असो वा द्वेषातून असो वा ग्रामीण बॅकड्रॉप वाली प्रेमकथा असो. पण एकंदरीतच प्रेक्षकांची आवड लक्षात घेता प्रत्येक कथेला त्याचा असा एक सूर असतो आणि तो अचूक मिळणं खूप गरजेचं असतं तर ती मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटते. तरुण पिढी असो वा मध्यम वयीन प्रेक्षक असो त्यांच्या विचारांशी साधर्म्य राखणाऱ्या मालिका पाहायला आवडतात. आणि आता तेदेखील OTT माध्यम असो वा टेलिव्हिजन चांगला विषय असला… त्यात काही वेगळं असलं तर त्यांना ते बघायला आवडतं. रसिक प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेऊन आगामी येणाऱ्या मालिकांमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले आहे जे आजच्या तरुण पिढीसोबत इतरांना देखील आवडतील. मालिकांच्या वेळेत देखील बदल करण्यात आले आहेत, नवा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा असा आमचा मानस आहे त्यामुळेच सुंदरा मनामध्ये भरली मालिका या मालिकेची वेळ आता बदलण्यात अली आहे त्यावर देखील प्रेक्षक तितकंच प्रेम करतील अशी आशा आहे.”
कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड विराज राजे म्हणाले, “बिग बॉस मराठीच्या या पर्वाची रंगत उत्तोरत्तर वाढत गेली. जसजसं पर्व पुढे जात राहिले तसतशी प्रेक्षकांची पसंती मिळत गेली. बिग बॉस मराठी नंतर कोणत्या विषयावरच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणाव्या हे आमच्या समोरचे खूप मोठे आव्हान होते. कारण प्रत्येकच वेळेस आमचा प्रयत्न असतो साचेबद्ध मालिकांच्या पलीकडे वेगळ्या विषयावरच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणाव्या आणि तश्याच दृष्टीने आम्ही कथेची रचना करतो जी प्रेक्षकांना एकत्र कुटूंबासोबत बघता येईल. आताची तरुण पिढी आणि मनोरंजन क्षेत्राकडे वाढणारा कल बघता रमा – राघव आणि पिरतीचा वनवा उरी पेटला या तरुणाईचा बाज असलेल्या मालिका आम्ही घेऊन येत आहोत. या कथांची मांडणीच मुळात खूप वेगळ्या पध्द्तीने केली आहे आणि तोच या मालिकांचा USP आहे असं आम्हांला वाटतं. दोन्ही कथा एकमेकांपेक्षा अतिशय वेगळ्या असल्यातरी विषय खिळवून ठेवणारे आहेत.”
पुढे ते म्हणाले, “रमा राघव हि दोन माणसांमधील वैचारिक तफावत आणि त्याचसोबत त्यांच्यामधली भांडणं, प्रेम एका वेगळ्या पद्धतीने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. पात्रांमधला नटखटपणा, त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. दुसरीकडे, ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित वास्तव्याशी मिळती जुळती अशी सावी – अर्जुनची प्रेमकथा ज्याला अस्सल ग्रामीण प्रेमाचा बाज आहे तिथे पराकोटीचा द्वेष आहे, पण गैरसमजुतीमधून हळूहळू फुलत जाणारं प्रेम प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.”
“रमा राघव” मालिकेच्या लेखिका रोहिणी निनावे म्हणाल्या, “ दोन अतिशय विरुद्ध कौटुंबिक वातावरणातून आलेल्या रमा आणि राघव यांच्यातील संघर्षाची आणि त्यातून पुढे फुलणाऱ्या प्रेमाची ही तिखट गोड गोष्ट आहे. संस्कार ,संस्कृती,परिश्रम याशिवाय आयुष्यात काही मिळत नसतं याची शिकवण अंगी भिनलेला राघव तर पैशांनी काहीही विकत घेता येतं आणि अशक्य असे काही नसते असा विचार करणारी, अहंकारी रमा यांचा सामना होतो..आणि या भांडणातूनच प्रेम फुलायला लागतं…आयुष्यात आदर्श,तत्व,मूल्य यांचं महत्व नवीन पिढीला हलक्या फुलक्या रीतिने पटवून देण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला आहे.. तरुण पिढी बरोबरच आबालवृद्धांना आवडेल अशी मला खात्री आहे.”
“पिरतीचा वनवा उरी पेटला” मालिकेचा लेखक चिन्मय मांडलेकर म्हणाला, “जीव झाला येडापिसा आणि राजा रानीची गं जोडी या दोन यशस्वी मालिकांमध्ये साम्य असलेली गोष्ट म्हणजे पोतडी एंटरटेनमेंट निर्मिती संस्था आणि कलर्स मराठी वाहिनी आणि आता हीच सगळी टीम पुन्हाएकदा एक नवीन मालिका घेऊन येते आहे पिरतीचा वनवा उरी पेटला. जीव झाला येडापिसा आणि राजा रानीची… जश्या अत्यंत मनोरंजक, खूप सुंदर पात्रांनी भरलेल्या मालिका होत्या तशीच हि नवी मालिका करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे प्रेम तुम्ही आमच्या आधीच्या मालिकांना दिलं तेच या मालिकेला देखील मिळेल अशी आमची आशा आहे. कथेबद्दल सांगायचे झाले तर मालिकेतील नायिका आहे सावी ती चोर आहे, ती लोकांना फसवते पण त्या मागचा तिचा हेतू उदात्त आहे. आणि आमचा जो नायक आहे अर्जुन त्याच्या बद्दलचा देखील लोकांचा समज वेगळा असतो पण तो पूर्णतः वेगळा आहे. असे दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय ठिणग्या उडतील याची गंमत बघायला मिळणार आहे.”
तेव्हा नक्की बघा पैजेवर जग जिंकणारी ‘रमा’ आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा ‘राघव’ यांची खट्याळ प्रेमाची तिखटगोड गोष्ट “रमा राघव” ९ जानेवारीपासून रात्री ९.०० वा. तर गैरसमजाचा निखाराच पेटवणार पिरतीचा वनवा “पिरतीचा वनवा उरी पेटला” रात्री १० वा. आपल्या कलर्स मराठीवर.