मुंबई : येस बँकेने आज श्रीमती अर्चना शिरूर यांची बँकेच्या चीफ ह्युमन रिर्सोसेस ऑफिसरपदी (सीएचआरओ) नियुक्ती जाहीर केली. त्या जूनमध्ये निवृत्त होत असलेले श्री. अनुराग अदलखा यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारतील. श्रीमती शिरूर यांना मनुष्यबळ संसाधन (एचआर) विभागाचा तीन दशकांचा अनुभव आहे. बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, मनुष्यबळ धोरण राबवण्याचे त्यांचे कौशल्य, व्यापक स्तरावरील स्थित्यंतर हाताळण्याची आणि सांस्कृतिक उद्दिष्टांचा विकास करण्याची त्यांची क्षमता यामुळे बँकेच्या नेतृत्व गटातील त्यांचा समावेश मौल्यवान ठरेल.
आपल्या नव्या भूमिकेत श्रीमती शिरूर येस बँकेच्या मनुष्यबळ संसाधन विभागाचे कामकाज हाताळतील तसेच लोकांविषयीच्या बँकेच्या धोरणाला चालना देतील. त्या श्री. अदलाखा यांच्यासोबत काम करून सूत्रे स्वीकारतील आणि गुणवत्ता आकर्षित करण्यासाठी, विकसित करण्यासाठी तसेच टिकवून ठेवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वगटासह काम करतील. त्या दर्जेदार कामगिरीस चालना देणारी संस्कृती विकसित करण्यासाठीही महत्त्वाचे योगदान देतील. बँकेच्या मनुष्यबळ संसाधन विभागाचे कामकाज पाहाण्यासाठी तसेच बँकेचा विकास व यशासाठी योगदान देण्यासाठी त्या सक्षम आहेत.
श्रीमती शिरूर यांनी यापूर्वी रिटेल शाखा बँकिंग, एचडीएफसी बँकेतील सरकारी व संस्थात्मक विभागाच्या प्रमुख म्हणून काम केले असून तेथे ५५,००० कर्मचारी वर्ग हाताळण्याचा अनुभव त्यांना आहे. त्याशिवाय त्यांनी आतापर्यंत कुशल कर्मचारी संपादन, प्रादेशिक एचआर टीम्स आणि बँकेचे कर्मचारी नातेसंबंध हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. एचडीएफसी बँकेमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील वरिष्ठ एचआर पदांवर काम केले आहे. त्यामध्ये बार्कलेज, टाटा समूह, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक (डीसीबी) यांचा समावेश होता.
नियुक्तीविषयी आनंद व्यक्त करत येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत कुमार म्हणाले, ‘श्रीमती अर्चना शिरूर यांचे बँकेच्या मनुष्यबळ संसाधन विभागाच्या नेतृत्वपदावर स्वागत करताना मला आनंद होत आहे. मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि कौशल्य लक्षात घेता बँकेचे लोकधोरण हाताळण्यात तसेच कंपनीची संस्कृती विकसित करण्यात त्या महत्त्वाचे योगदान देतील याची खात्री वाटते. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बँकेचे भविष्य सुरक्षित होताना पाहाण्यासाठी तसेच बँकेची उद्दिष्टे साकार करण्यासाठी एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.’
श्रीमती शिरूर यांनी सिम्बायसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथून पर्सनल मॅनेजमेंटची मास्टर्स पदवी घेतली असून मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्रातील पदवी घेतली आहे. त्यांची नियुक्ती येस बँकेसाठी सकारात्मक घटना असून त्यातून बँकेची गुणवत्ता आकर्षित करण्याची तसेच टिकवून ठेवण्याची बांधिलकी दिसून येते.