पुणे १७ डिसेंबर २०२२ : यजमान पुण्यासह गतविजेत्या कोल्हापूर आणि उपविजेत्या नागपूर यांच्यासह मुंबईने येथे सुरु असलेल्या वायफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत चारही तुल्यबळ संघांनी अपेक्षित कामगिरी करताना सहज विजयासह आपली आगेकूच कायम राखली. पुणे मसंघाने सोलापूरचे आव्हान २-० असे सहज संपुष्टात आणले. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला एम. सुदीशने गोल नोंदवला. त्यानंतर सतिश हवालदारने ५७व्या मिनिटाला आघाडी दुप्पट करताना पुण्याचा विजय साकार केला.
हिमांशुच्या ४ गोलच्या धडाक्यामुळे दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईने सांगलीचे आव्हान ५-० असे परतवून लावले. हिमांशूने २३व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर भरपाई वेळेतील दुसऱ्या (४२वे मिनिट) मिनिटाला त्याने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. त्यापूर्वी आर. तेजसने २७व्या मिनिटाला मुंबईची आघाडी दुप्पट केली होती. उत्तरार्धाने हिमांशूने ४६ आणि ६५व्या मिनिटाला आणखी दोन गोल करून मुंबईची आघाडी भक्कम केली. अखेरीस हीच आघाडी कायम राखत मुंबईने विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य एका सामन्यात सुफियानच्या हॅटट्रिकने नागपूरने औरंगाबादचे आव्हान ६-० असे संपुष्टात आणले. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला स्टॅनले पीटरने आघाडी मिळवून दिल्यावर सुफियानने नागपूरची आघाडी भक्कम करताना तीन गोल केले. सुफियानने ४०, ६८ आणि ७८व्या मिनिटाला गोल केले.
नागपूरचे अन्य गोल पी. तुषाल आणि मेहुल सिंदरामने केले.
गतविजेत्या कोल्हापूरनेही आपला धडाका कायम राखताना परभणीवर ४-० असा विजय मिळविला. दोन्ही सत्रात त्यांनी दोन गोल केले. इंद्रजित चौगुले, करण चव्हाण, अरबास बागवान, प्रथमेस हेरेकर यांनी गोल करून विजयात आपला वाटा उचलला.
निकाल:उपांत्यपूर्व फेरी
कोल्हापूर ४ (इंद्रजित चौगुले १९वे, करण चव्हाण ४५वे, अरबास बागवान ६२वे, प्रथमेश हेरेकर ७६वे मिनिट) वि.वि. परभणी ०
नागपूर ६ (स्टॅनले पीटर ५वे, सुफियान शेख ४०, ६८, ७८वे मिनिट, पी. तुषाल ६६वे, मेहुल सिंदराम ७६वे मिनिट) वि.वि. औरंगाबाद ०
मुंबई ५ (हिमांशु २३, ४०+२वे ४६, ६५वे मिनिट, तेजस २७वे मिनिट) वि.वि. सांगली ०
पुणे २ (एम. सुदीश १ले मिनिट, सतिश हवालदार ५७वे मिनिट) वि.वि. सोलापूर ०