मुलगा होणार की मुलगी, हे नेमकं कसं ठरतं? वाचा यामागचं वैज्ञानिक उत्तर!

542

महाराष्ट्रात एका कीर्तनकाराच्या वक्तव्यावरुन वादंग उठले होते. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात असं म्हटलं होतं की, “स्त्रीसंग जर सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते. आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती ही नालायक आणि खानदान मातीत घालणारी निपजते. टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब…”

त्यांच्या याच वक्तव्यावरुन गदारोळ सुरू झाला. समाजातील विज्ञानवादी लोक त्यांच्यावर टीका करत होते तर त्यांचे भक्त त्यांच्या म्हणण्याचं समर्थन करत होते .

इंदुरीकरांचं हे वक्तव्य गुरुचरित्र आणि आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार आहे असं समर्थकांचं म्हणणं आहे.

भारतात गर्भलिंग निदान चाचणीला परवानगी नाहीये. कारण त्या चाचणीमुळे लोक स्त्री गर्भ काढून टाकायला लागले. कारण अनेकांना आपल्याला मुलगा व्हावा असं वाटतं. आणि गर्भलिंग निदान चाचणीत गर्भ मुलीचा असल्याचं कळालं तर कित्येक लोक थेट गर्भपात करतात.

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असतो अशी आपल्या समाजातील समजूत आहे. अशा वेळेस असं वक्तव्य आलं की, त्यावर चर्चा तर होणारंच. आता होणारी टीका वाढल्यामुळे अहमदनगरच्या PCPNDT समितीने महाराजांना एक नोटीस दिली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

पण याबाबतीत विज्ञान काय म्हणतं हे जर पाहिलं तर असं लक्षात येतं की, माणसाच्या शरीरात २४ प्रकारचे गुणसूत्र असतात आणि ती स्त्री आणि पुरुष या दोघांकडेही असतात.

स्त्रियांमध्ये २२ गुणसूत्र असतात आणि एक लिंग गुणसुत्र (XX) असतं. पुरुषांकडे २२ गुणसुत्र आणि एक लिंग गुणसुत्र (XY) असतं.

स्त्री पुरुष समागम नंतर जर एक्स एक्स (XX) गुणसूत्र मिळाली तर मुलगी जन्माला येते आणि एक्स वाय (XY) ही गुणसूत्र मिळाली तर मुलगा जन्माला येतो. म्हणजे, मुलगा किंवा मुलगी जन्माला येणे हे पुरुषावर अवलंबून आहे.

स्त्री पुरुष समागमाच्या वेळी जेव्हा पुरुषाच्या शरीरातील शुक्राणू स्त्रीच्या अंडाशया जवळ जातात तेव्हा त्यातील वाय (Y) गुणसूत्र हे जलद गतीने स्त्रीबीजाकडे जातात परंतु ते फार अल्पजीवी असतात.

एक्स (X) गुणसूत्र हे थोडेसे मोठे आणि सावकाश स्त्रीबीजाकडे जातात आणि वाय (Y) गुणसूत्रांपेक्षा ते जास्त काळ तग धरतात. यापैकी जे लवकर होतं त्यानुसार गर्भधारणा होते आणि मुलगा किंवा मुलगी हे ठरवलं जातं.

जर आपण परदेशातही पाहिलं तर तिकडेही अशा काही समजुती आहेत असं दिसून येतं. म्हणजे मुलगा किंवा मुलगी हवी असल्यास ठराविक दिवसातंच, काळातंच सेक्स करावा.

एखाद्या विशिष्ट प्रकारचं डायट करावं जेणेकरून आपल्याला हवं ते अपत्य आपण जन्माला घालू शकू. सेक्स करताना विशिष्ट पोझिशन घ्यावी. पण त्याला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही.

हे असं काही करून, ठरवून तुम्हाला मुलगा किंवा मुलगी होणार नाही कारण मुलगा किंवा मुलगी होण्याचे ५०-५०% चान्सेस हे सेक्स केल्यानंतर असतातच. (गर्भधारणा होऊ नये म्हणून जर कोणती काळजी घेतली नसेल तर)

सध्या मात्र वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरून राहणारा गर्भ मुलगा की मुलगी हे ठरवता येऊ शकते. त्यासाठी सध्या बऱ्याच पद्धती वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जातात. सेक्स सिलेक्शन किट, एरिक्सन मेथड, प्रींप्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग.

सध्या वापरात असणाऱ्या in vitro fertilization (IVF) या तंत्रज्ञानाद्वारेही मुलगा की मुलगी ठरवता येतात. भारतामध्ये या तंत्रज्ञानामुळे वंध्यत्व असलेल्या लोकांसाठी किंवा गर्भधारणा न होणाऱ्या स्त्रियांसाठी ही पद्धत उपयोगी ठरली आहे.

यामध्ये स्त्री गर्भात फलित झालेले साधारण दोन पेक्षा जास्त बीज सोडले जातात त्यापैकी किमान एक तरी बीज जगतं. मात्र त्यातलं स्त्रीबीज कोणतं आणि पुरुषबीज कोणतं हे अजून तरी वेगळं न करता मूल जन्माला घालणं हाच उद्देश आहे.

परंतु परदेशात काही आजारांच्या निदान प्रक्रियेत या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. म्हणजे जर एखाद्या कुटुंबात विशिष्ट आजाराची म्हणजे हेमोफिलिया, सिकल सेल यासारख्या आजारांची फॅमिली हिस्टरी असेल किंवा जेनेटिकली प्रॉब्लेम असतील तर ते शुक्राणू फलित केले जात नाहीत.

ठरवून मुलगा किंवा मुलगी जन्माला घातले जातात. काही काही कुटुंबात फक्त मुलीच जन्माला येतात तर काही कुटुंबात मुलगे जन्माला येतात. अशा ठिकाणी कुटुंबाचा बॅलन्स असावा म्हणून मग ठरवून गर्भधारणा करण्यात येते.

पण ती शक्यता भारतात फार कमी आहे. इकडे प्रत्येकाला मुलगा हवा असतो म्हणून अजून तरी आपल्याकडे याला परवानगी नाहीये.

आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि मुलं जन्माला घालणं ही खूप खर्चिक गोष्ट आहे. आणि त्यातही त्यातला त्याचा सक्सेस रेट सध्या जरी जास्त दिसत असला तरी बऱ्याचदा तो फेलही होतो आणि प्रत्येक वेळेस इतका खर्च करणं सगळ्याच कुटुंबांना जमतं असं नाही.

परदेशातही सरसकट अशी गर्भधारणा केली जात नाही. तिकडेही यासाठी बर्‍याच अटी आहेत म्हणजे तुमचं लग्न झालेलं असलं पाहिजे, तुमचं वय ठराविक असलं पाहिजे.

मुलगा असेल आणि मुलगी हवी असेल तर परवानगी दिली जाते किंवा मुलगी असेल तर मुलगा होण्यासाठी परवानगी दिली जाते.

IVF तंत्रज्ञानात पी जी डी( प्रीइम्पलांटेशन जेनेटिक डायग्नोसिस) आणि पी जी एस(प्रीइम्पलांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग) या दोन चाचण्या करता येतात.पी जी डी चाचणीत गर्भात काही जनुकीय आजार किंवा व्यंग असतील तर होणाऱ्या संततीला त्याचा त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते.

तर पी जी एस मध्ये क्रोमोझोम डिसॉर्डर (डाऊन सिंड्रोम) त्यांची चाचणी घेतली जाते आणि गर्भाला सुरक्षित केलं जातं. पी जी डी आणि पी जी एस या तंत्रामध्ये मात्र शंभर टक्के अॅक्युरॅसी आहे.

यानुसार बाळाचा गर्भ ठरवणं शक्य होतं आणि निरोगी बाळ जन्माला घालता येऊ शकतं.

दुसऱ्या एका पद्धतीनुसार, बाळाचं लिंग ठरवता येतं आणि ती म्हणजे एरिक्सन मेथड. यामध्ये पुरुषाचे शुक्राणू एका टेस्टट्यूबमध्ये घेतले जातात.

त्यातील जे सगळ्यात जलद खाली येतात त्यांना वेगळे केलं जातं कारण ते मुलगा होण्याचे शुक्राणू असतात तर हळू होणारे शुक्राणू हे मुलगी होण्याचे असतात.

हे दोन्ही प्रकारचे शुक्राणू वेगळे करता येणं शक्य आहे आणि हेच हव्या त्या गर्भाचे शुक्राणू स्त्री अंडाशयात सोडले जातात. परंतु याचा सक्सेस रेट आय व्ही एफ पेक्षा कमी आहे.

यातून गर्भधारणा होईलच याची शाश्वती नाही. पण झाली तर मात्र इच्छित फलप्राप्ती होते. (मुलगा किंवा मुलगी)

आणखीन एक पद्धत इच्छित गर्भधारणा होण्यासाठी आहे आणि ती म्हणजे सेक्स सिलेक्शन किट. यामध्ये काही हर्बल औषध, विटामिन्स, थर्मामीटर आणि ओव्होल्युशन प्रेडिक्शन टेस्ट स्टिक दिले जातात.

यानुसार, शरीराचं तापमान पाहून सेक्स केला जातो. विटामिन्स आणि हर्बल औषधं घेतली जातात. कीट निर्मात्यांचा दावा आहे की, याने १००% यशस्वी इच्छित गर्भधारणा होतेच. परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या दाव्यात काहीच तथ्य नाही.

लैंगिक निवड हा आता महाराष्ट्र, भारतातीलच नव्हे तर परदेशातही वैद्यकीय क्षेत्रातही एक चर्चेचा विषय झाला आहे. काही जणांना वाटतं की, यामुळे सामाजिक संतुलन बिघडेल. तर काहींना वाटतं की, सामाजिक संतुलन त्यामुळे टिकेल.

न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर वुमन रिप्रोडक्टिव केअरचे विशेषज्ञ आणि कार्यक्रम संचालक मार्क सॉर त्यांचं मत आहे की, लैंगिक निवड ही नैतिक गोष्ट नाही. तिला प्रजनन उपचारांमध्ये स्थान नाही.

मानवी भ्रूण नष्ट करणे मला मान्य नाही. अर्थात सगळ्याचं डॉक्टरांचा याला पाठिंबा नाही, किमान जनुकीय चाचण्या तरी करता याव्यात असं त्यांचं म्हणणं आहे.

म्हणूनच भारतात जेव्हा अशी वक्तव्य जेव्हा होतात तेव्हा त्यावर वादळ उठण्याचे एकच कारण आहे की,अजूनही स्त्री पुरुष समानता आपल्या देशात नाही. मुलीच्या जन्माचे स्वागत इथे होत नाही.

मुलगा हवाच या समजुतीने, मुलगा व्हावा म्हणून मग इथला भोळाभाबडा समाज अशा सगळ्या गोष्टी करतो. अशा लोकांचा गैरफायदाही घेतला जातो.