मातृत्वाच्या सन्मानासाठी ‘मदर्स युनायटेड मुमेंट’

68

पुणे, १४ नोव्हेंबर २०२२ : “मदर्स युनायटेड मुमेंट (एमयुएम-मम्) हे व्यासपीठ मातृत्वाचा सन्मान वाढवणारे आहे. मम् एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरांतील मातांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत मातांना सक्षम करण्यासाठी काम होईल, असा विश्वास वाटतो,” असे मत उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या, अंत्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक नीता लाड यांनी व्यक्त केले.

भारताच्या पहिल्या बेबी फोटोग्राफर शिखा खन्ना यांच्या ‘हंड्रेड सेल्फ पोर्ट्रेट हंड्रेड ड्रीम्स’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. लवळे येथील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टमध्ये झालेल्या समारंभावेळी भारतीय झुंबा अँबॅसेडर सुचेता पाल, बिजा हाऊसच्या संस्थापिका गीतिका सहगल आदी उपस्थित होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या शंभर मातांच्या प्रेरणादायी कहाण्या या पुस्तकात आहेत. यावेळी मम् एम्पॉवरमेंट फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. सुंदरजी इन्स्टिट्यूट ऑफ स्पेशल स्कुलमधील मुलांनी केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

शिखा खन्ना म्हणाल्या, “हा प्रवास सुरु केला, तेव्हा जगभरातून इतके प्रेम आणि कौतुक मिळेल, असे वाटले नव्हते. या शंभर महिलांची प्रेरणा माझ्यासोबत सदैव असते. याचा माझ्या जीवनावर खोलवर चांगला परिणाम झाला असून, मला अधिक सक्षम होण्याची प्रेरणा या मातांनी दिली आहे. प्रत्येक मातेमधील वात्सल्य, ममत्वभाव मला प्रेरित करतो. ”

“मम् मातांना सक्षम करणारे व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन पत्र लिहून महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. फोटोग्राफी व इतर कला प्रकारांच्या वापरातून जागरूकता आणि सक्षमीकरणाचे प्रभावी कार्य करण्याचा आणि पुढील पिढीला या प्रेरक कथा सांगण्याचा या व्यासपीठाचा उद्देश असणार आहे. विशेषतः मातांसाठी आयोजिलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात विविध उपक्रम, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सत्र, साउंड हीलिंग, ऑइल वर्कशॉप आणि मम् मॅरेथॉनचे आयोजन केले होते. जगभरातील विविध शहरात असे उपक्रम, कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत,” असेही शिखा खन्ना यांनी नमूद केले.