पुणे : महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या आव्हानात्मक जीवन वास्तवावर प्रकाश टाकणारा ‘ तो ‘ शेवटचा दिवस ‘ हा दीर्घांक रंगभूमीवर येणार असून पुण्यात अक्षय तृतीयेला सायंकाळी संहिता पूजन कार्यक्रम होणार आहे. ‘माय स्टेज’ या निर्मिती संस्थेतर्फे या दीर्घांकाची निर्मिती करण्यात येत असून लेखन दिग्दर्शन विनिता पिंपळखरे यांचे आहे. संहिता पूजन कार्यक्रमासाठी संगीतकार अविनाश-विश्वजित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या नव्या दिर्घाकाच्या संहितेचे पूजन , तालमीचा प्रारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर,२२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजता हॉटेल किमया सभागृह, कर्वे रस्ता येथे होणार आहे. मे महिन्यामध्ये रसिकांच्या भेटीला हा दीर्घांक येणार असून राज्यभर त्याचे प्रयोग होणार असल्याची माहिती निर्माते प्रशांत पद्माकर घैसास यांनी पत्रकाद्वारे दिली.
गिरीश परदेशी,प्रज्ञा गुरव,प्रशांत घैसास,योगिनी गोखले,नितीन पारेगावकर हे कलाकार या दीर्घांकामध्ये काम करणार आहेत. सुरेंद्र गोखले हे या दीर्घांकाचे सूत्रधार आहेत.महिला पोलीस अधिकाऱ्याकडे त्यांच्या कारकिर्दीत २५ वर्षांपूर्वीच्या कोडे बनून राहिलेल्या गुन्ह्याचा तपास सोपवला जातो आणि ‘ तो शेवटचा दिवस ‘ या दीर्घांकाचा उत्कंठावर्धक थरारक प्रवास उलगडू लागतो.
‘महिला पोलीस अधिकाऱ्याच्या जीवन वास्तवाशी संबंधित थ्रिलर ,क्राईम स्टोरी प्रथमच रंगमंचावर येत आहे’,असे लेखिका विनिता पिंपळखरे यांनी सांगितले. त्यातून महिला तपास अधिकाऱ्यांच्या आव्हानात्मक जीवन वास्तवाचे दर्शन रसिकांना घडणार आहे,असे त्यांनी सांगितले. ‘वेगळ्या निर्मितीचे आव्हान म्हणून आम्ही या दीर्घांकाकडे पाहत असून वास्तववादी निर्मितीचा वस्तुपाठ आम्ही समोर आणणार आहोत’,असे निर्माते प्रशांत पद्माकर घैसास यांनी सांगितले.