पुणे : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडून संविधानाच्या एक लाख प्रती मोफत वाटप अभियानाचे कौतुक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या संविधानाच्या एक लाख प्रती मोफत वाटप अभियानाचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी कौतुक केले. आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कांबळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, १४ एप्रिल २०२३ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान (एक लाख प्रती) मोफत वाटण्यात येणार आहेत.
मुंबईतील राजभवनमध्ये आयोजित एका कार्यक्रमावेळी शशिकांत कांबळे यांनी ॲड. राहुल नार्वेकर, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अभियानाची माहिती देत संविधानाची प्रत भेट दिली. यावेळी उपस्थित विविध शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना संविधान भेट देण्यात आले. यावेळी ॲड. राहुल नार्वेकर यांनी अभियानाविषयी सविस्तर माहिती घेतली व संविधान जनमानसात पोहोचवण्यासाठी काम करत असल्याबद्दल शशिकांत कांबळे यांचे कौतुक केले.
पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, घोडावत शिक्षण संस्थेच्या श्रेया घोडावत, खडकी शिक्षण संस्थेचे कृष्णकुमार गोयल, भोर इंडस्ट्रीजचे सचिन भोर यांच्यासह अन्य संस्थांच्या प्रमुखांना कांबळे यांनी संविधानाची प्रत भेट दिली.