पुणे : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे येत्या शनिवारी (ता. 2 सप्टेंबर) तांत्रिक कामगारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येरवडा येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्क्रूतिक कला रंगमंदिरात सकाळी 11.30 वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण कंपनीचे संचालक संजय ताकसांडे, अरविंद भादीकर, महानिर्मितीचे संचालक एस. एम. मारुडकर, महापारेषणचे संचालक सुगत गमरे उपस्थित राहणार आहेत.
महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, सुनील पावडे, संजय धोके, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, भारत पाटील, महानिर्मितीचे मुख्य अधिकारी पी. एल. वारजूरकर आदी कार्यशाळा वेळी उपस्थित असणार आहेत. राज्यभरातून ८०० ते १००० वीज तांत्रिक कामगार कार्यशाळेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजक हाजी सय्यद जहिरोद्दीन, स्वागताध्यक्ष बाळासाहेब सायकर व कार्यशाळा प्रमुख अपसरपाशा सय्यद यांनी दिली आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी, हितासाठी तसेच संघटनेला सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.