महापुरुषांची वैचारिक ज्ञानसत्ता बदलत्या काळाची गरज

61
महापुरुषांची वैचारिक ज्ञानसत्ता बदलत्या काळाची गरज

पुणे : महापुरुषांची वैचारिक ज्ञानसत्ता बदलत्या काळाची गरज “महापुरुषांनी समाजात क्रांती घडविण्यासाठी अनेकदा समाज प्रवाहाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे इतिहासात दिसते. सध्याच्या परिस्थितीत उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी महापुरुषांची ही वैचारिक ज्ञानसत्ता बदलत्या काळात आत्मसात करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेच्या वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने बीजेएस सभागृहात आयोजित तेराव्या धर्म मैञी विचारवेध संमेलनाच्या समारोपावेळी डॉ. मनोहर जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे होते.

प्राचार्य प्रा. डॉ. संजय गायकवाड यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे, संमेलनाध्यक्ष प्रा. प्रदीप कदम, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सहदेव चव्हाण, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.

यावेळी वैजयंती जगताप, योगेश्वरी जाधव, बलजीत सिंग मठारू, प्रा. सुभाष शिंदे, डॉ. भूषण फडतरे, डॉ. देविदास पाटील, राजेश शुक्ला, कमलाकर डोके, डॉ. आकांक्षा गोयल, डॉ. रमेश गायकवाड, डॉ. मनीषा बोरा यांना ‘बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

डॉ. मनोहर जाधव म्हणाले, “विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आपुलकीचा संवाद हवा. समाजाच्या उन्नतीमध्ये शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका आहे. मानवी मूल्यांचा सकारात्मक मंत्र आत्मसात केला, तर आयुष्य समृद्ध होते. साहित्यात समाज परिवर्तनाची ताकद असते. मात्र ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचायला हवे.”

प्रकाश रोकडे म्हणाले, आपल्या देशांत विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना काही धर्मांध राजकारणी मात्र धर्माधिष्ठित राजसत्तेचे दिवास्वप्न पाहत आहेत. हे अखंड भारतासाठी घातक आहे.  सध्या धर्मांतरविरोधी कायदा करण्याची महाचर्चा, तसेच शहरांच्या नामांतराची घाई सुरु आहे. भारतीय लोकशाहीला हे मारक असून, सर्वसामान्य जनतेचे मन्वंतर करणे हा त्यावरील रामबाण उपाय आहे.”

सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. प्रा. डॉ. सहदेव चव्हाण यांनी आभार मानले.