पुणे : आपल्या धडक कामगिरीने राज्य कर्मचाऱयांना धडकी भागविणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती मंत्रालयाच्या मराठी विभागाच्या सचिवपदी करण्यात आली असून पुण्यात साखर आयुक्तालयाची जबाबदारी नाशिकच्या महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
राज्य शासनाने आयएएस दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी आज प्रसिद्ध केली. यांमध्ये धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रचलित असणारे तुकाराम मुंढे यांच्याकडे मंत्रालयातील मराठी भाषा विभागातील सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्निर्माण प्रकल्पाच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्रालयाच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असणारे संजीव जैस्वाल यांची मुंबई म्हाडाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वासेकर यांच्याकडे पुणे येथील पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.