मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त लेख

86

सौंदर्य,माधुर्य आणि विविधता यांनी नटलेल्या आणि ज्ञानाचा सागर असलेल्या माय मराठीचे श्रेष्ठत्व!

प्रस्तावना – मराठी भाषा संस्कृतनंतर जगातील सर्वांत सात्त्विक भाषा आहे. नादब्रह्माची अनुभूती देणार्‍या मराठी भाषेच्या अंगभूत सात्त्विकतेचा लाभ आपण स्वतःच्या आचरणातून घ्यायला हवा. यासाठी प्रत्येकानेच शुद्ध मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करायला हवा; कारण जेथे उच्चारांची शुद्धता असते, तेथे पावित्र्य असते आणि तेथेच ईश्‍वरी तत्त्व आकृष्ट होते.मराठी भाषेवरही यवनी सत्तेकडून करण्यात आलेली आक्रमणे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी परतवून लावली. त्यानंतर भाषेवर झालेल्या इंग्रजीच्या आक्रमणाला परतवून लावण्याचे कार्य निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य सर्व आंदोलने सांभाळून भाषाशुद्धीचे कार्य अनेक वर्षे चालवून ते नेटाने पुढे नेले. संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी आदी संतांनी विविध प्रकारचे गद्य आणि पद्य यांच्या सुंदरतेने आभूषित केलेल्या आणि जगभर गौरवलेल्या या मायबोलीची अवीट गोडी खर्‍या अर्थाने अनुभवण्यासाठी तिच्या निकटतम सहवासाची (अभ्यासाची) आवश्यकता आहे. तरच आपल्या मायबोलीला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होईल आणि खर्‍या अर्थाने तिचा तो सन्मान होईल. हा लेख वाचून सर्वांनाच मराठी भाषेचे सौंदर्य, माधुर्य आणि विविधता लक्षात यावी त्यासाठी हा लेखप्रपंच !
व्याकरणाचे महत्त्व –  आपल्या बोलण्यात लयबद्धता यावी, गोडवा यावा, सौंदर्य यावे, ताल असावा, यांसाठी नियम सांगितले गेले. व्याकरणाची निर्मिती होऊन सुसूत्रता आणली. मराठी म्हणजे ज्ञानाचा सागर ठरली, ती यामुळेच ! संस्कृत नंतरची संपन्न अन् सुंदर भाषा म्हणजे मराठीच ! मराठी भाषेत शब्दांना लागणार्‍या  काना, मात्रा, अनुस्वार, स्वल्पविराम, संधी, विभक्ती, प्रत्यय इत्यादींच्या वापराला महत्त्व आहे; कारण त्यांच्या अनाठायी वापराने शब्दाचा अर्थ पालटतो. छोट्याशा स्वल्पविरामानेही अर्थाचा अनर्थ होतो.
उदा. ‘शत्रूको रोको, मत जाने दो’ याऐवजी ‘शत्रूको रोको मत, जाने दो’, असे लिहिल्यास भलताच गोंधळ होईल.
 
भाषाशुद्धीचे महत्त्व – ‘तांदूळ नीट निवडलेले नसले, तर जेवतांना खडा लागतो आणि जेवणातला आनंद न्यून होतो. त्याप्रमाणे लिखाणात किंवा बोलण्यात इतर भाषांतील शब्द आल्यास त्यातील आनंद न्यून होतो.
व्याकरण अशुद्ध लिहिल्यास एकाच वाक्याचे दोन वेगवेगळे अर्थ होतात. र्‍हस्व, दीर्घ योग्य प्रकारे न लिहिल्यास अर्थात पालट होतो. उदा.  रवि – सूर्य , रवी – . ताक घुसळण्याची रवी
अश्याच प्रकारे विरामचिन्हांचे स्थान पालटल्यामुळे वाक्याच्या अर्थावर परिणाम  होतो.
नादब्रह्मातून भाषेची उत्पत्ती  – कोणतीही भाषा पाहिली तर तिच्यात अक्षरे असतात. त्यांचे उच्चार असतात.कोणत्याही निर्मितीसाठी किमान २ गोष्टींची आवश्यकता असतेच. भारतीय तत्त्वज्ञानानुसार ही २ तत्त्वे म्हणजे प्राण आणि आकाश ! ब्रह्म-माया, प्रकृति-पुरुष, शिव-शक्ति आदी नावेही याच २ तत्त्वांची आहेत. ही दोन्ही तत्त्वे कार्यरत होऊन प्रथम ध्वनी (नाद) उत्पन्न झाला. हेच नादब्रह्म !   त्याचे सगुण रूप म्हणजेच ॐकार ! या नादब्रह्मातून अक्षरे आली. ते अक्षरब्रह्म ! त्यांतून शब्द आले ते शब्दब्रह्म ! या सगळ्यांचीच शास्त्रशुद्ध अशी मांडणी म्हणजेच ‘भाषा’ ! अक्षरसमूह म्हणजे आपली वर्णमाला. ही मूळ वर्णमाला आपण बहुतेक सर्व भाषांसाठी थोड्या-फार अंतराने संस्कृतमधूनच स्वीकारली आहे. भारताबाहेरच्या कोणत्याही भाषेत इतके विस्तृत काहीही नाही. उदा. इंग्रजीत (A to Z) केवळ २६ अक्षरे ! त्यांतच सगळे व्यवहार ! त्यात संपन्नता अन् सौंदर्य कोठे आहे, हे दुर्बिणीतून शोधावे लागेल.
अलंकारांमुळे मराठीला लावण्य मिळाले –प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी अलंकार वापरले जात आहेत. मराठीलासुद्धा सजवले अन् खुलवले ते अलंकारांनी ! हे अलंकार म्हणजे अनुप्रास, श्‍लेष, व्याजोक्ति, वक्त्रोक्ति, उपमा, उत्प्रेक्षा, यमक इत्यादी आहेत.
समासामुळे मराठीचे सौंदर्य येते  – मराठीची आणखी वैशिष्ट्ये पाहू. एखाद्या गोष्टीची फोड करून सांगितली की, ती सोपी होते. भाषेत याला ‘समास’ नाव दिले गेले. समासांची काही नावे माहिती म्हणून देत आहे – द्वंद्व, तत्पुरुष, बहुव्रीही, मध्यम-पद-लोपी इत्यादी.
*अन्य भाषांच्या तुलनेत मराठी भाषेची संपन्नता!* – आता इतर भाषांची तुलना मराठीशी केली, तर काय दिसते ते पाहू !  मराठीत  कितीतरी वैशिष्ट्ये दिसतात. ओव्या, ऋचा, श्‍लोक, अभंग, ठुमरी, भावगीत, भक्तीगीत, वात्रटिका, चारोळ्या, लावणी, पोवाडा, अंगाई गीत, जात्यावरच्या ओव्या, भूपाळी, पाळणा, येळकोट, अष्टक, स्तवन इत्यादी पुष्कळ मोठी सूची होईल. असा भाग अन्य परकीय भाषेत नाही या वरून कोणती भाषा श्रेष्ठ वाटते, ते आपणच ठरवावे.
मराठी भाषेची सध्याची विदारक अवस्था  – ए, तू जरा जल्दीच निघून ये बरका  ! मी तुझ्यासाठी वेट (wait) करीन ! माझ्या टीचर्सनी चांगलं टीच केलं; म्हणूनच मी हे सक्सेस गेन (gain) करू शकलो ! अश्या प्रकारे बोलले जाते हे बोलणे मराठी आहे का याचा विचार जरूर करायला हवा .मराठी मधील घुसलेले शब्द त्यातून बाहेर काढून शुद्ध मराठी उपयोगात आणली पाहिजे. मराठी भाषेची अवस्था दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. मराठी भाषेतील शब्दांची जागा इंग्रजी, उर्दू, फारशी आदी भाषांतील शब्दांनी घेतली आहे. मराठीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. त्यामुळे मराठी भाषेतील शुद्धत्व, सोज्वळता हरपत चालली आहे. सौंदर्य लोपवणारे स्वरूप तिला येत चालले आहे. ती तेजोहीन झाली आहे आणि काही तुरळक भाषाभिमानी वगळता याला कोणीही विरोध करत नाहीत. ‘माय मराठी’ला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठी भाषिकांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करून दृढ निश्चय करूया आणि संघटितपणे ‘मराठी’चे रक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होऊया!
सौजन्य – सनातन संस्था , संकलक –  प्रा. विठ्ठल जाधव 
संपर्क –  ७०३८७१३८८३