ब्रिण्टन हेल्थकेअरने यूकेमध्ये सुरू केले आपले जागतिक संशोधन केंद्र

69
Brinton Healthcare opens its Global R & D Centre in the UK

पुणे :  ब्रिण्टन हेल्थकेअरने यूकेमध्ये सुरू केले आपले जागतिक संशोधन केंद्र. आपले जगभरातील कार्यक्षेत्र अधिक पक्के करण्यासाठी, ब्रिण्टन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने, युनायटेड किंग्डममध्ये आपल्या जागतिक संशोधन व विकास केंद्राचे उद्घाटन केले. इंग्लंडमधील चेशायर कौण्टीतील रुनकॉर्न येथील हेल्थ टेक्निकल अँड बिझनेस पार्कमधील या जागतिक संशोधन व विकास केंद्राचे उद्घाटन, ब्रिण्टन फार्माचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक राहुलकुमार दर्डा यांच्या उपस्थितीत, यूकेतील बिझनेस अँड ट्रेड विभागातील मिनिस्टर ऑफ स्टेट नायजेल हडलस्टन यांच्या हस्ते करण्यात आले. 

हडलस्टन यावेळी म्हणाले की “रुनकॉर्नमधील या नवीन आस्थापनाचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. आमच्या देशांतर्गत आरोग्यसेवा व्यवस्थेला ह्या केंद्राची मदत होईल तसेच अतिकुशल रोजगारही निर्माण होईल. यूके-भारत यांच्यातील व्यापार दोन्ही देशांसाठी किती लाभदायी ठरू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. “आमचे व्यापारी संबंध अधिक खोलवर नेणारा यूके-भारत व्यापार करार (एफटीए) अधिक गुंतवणूक संधींना मार्क मोकळा करून देऊ शकतो आणि ब्रिण्टन हेल्थकेअर यूके लिमिटेडसारख्या युके आणि भारतातील कंपन्यांसाठी परस्परांच्या देशात व्यवसाय करणे अधिक सोपे करू शकतो.”

ब्रिण्टनचे जागतिक कार्यक्षेत्र ३२ देशांमध्ये विस्तारलेले असून, संशोधन व विकास केंद्र हे कंपनीसाठी एक मोक्याचे आस्थापन आहे. त्यामुळे आरोग्य व जीवनविज्ञान क्षेत्रांतील संशोधन अधिक खोलवर नेण्यात मदत होणार आहे तसेच अत्याधुनिक आरोग्यसेवा उत्पादने तयार करण्याच्या कंपनीच्या महत्त्वाकांक्षेला पाठबळ मिळणार आहे. या नवीन आस्थापनामध्ये पुढील ५ वर्षांत जीबीपी ३० दशलक्ष गुंतवण्याचे कंपनीचे नियोजन आहे.  

ब्रिण्टन फार्माचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक राहुलकुमार दर्डा म्हणाले. संशोधन व विकास केंद्राचा प्राथमिक भर स्थानिक त्वचेसंदर्भातील प्रक्रियांवर असेल आणि त्वचेच्या वेगवेगळ्या विकारांवर अभ्यास करण्यावर हे केंद्र लक्ष केंद्रित करेल. “या विभागाची सध्या वाढ होत आहे. त्वचाविकारांवर चाकोरी मोडणारी औषधे विकसित व्हावीत व निष्पत्ती आधारित उपचार विकसित व्हावेत याकडे जग डोळे लावून बसले आहे. आम्हाला ह्या आस्थापनाचा उपयोग करून घेऊन अर्थपूर्ण उपाय द्यायचे आहेत.

नवोन्मेषकारी सूत्रे (फॉर्म्युलेशन्स) विकसित करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या ब्रिण्टनने १४ अनन्यसाधारण सूत्रे बाजारात आणली आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून परवडण्याजोगी नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्याचे उद्दिष्ट नवीन आर अँड डी केंद्रापुढे आहे. रोचक बाब म्हणजे कंपनीकडे जागतिक दर्जाचे, विविध ठिकाणांवरून काम करणारे उत्पादन सहयोगी आहेत आणि कंपनीची उत्पादने डब्ल्यूएचओ, जीएमपी, पीआयसीएस, पीपीबी व एनडीए ह्यांच्यासह अनेक जागतिक नियामक प्राधिकरणांचे काटेकोर मानके पूर्ण करणारी आहेत. 

ब्रिण्टन या औषधनिर्मिती उद्योगसमूहाचे कार्यक्षेत्र भारत, यूके, आग्नेय आशिया, लॅटिन अमेरिका आणि सीआयएस देशांमध्ये पसरलेले आहे. यूकेमध्ये वाढीसाठी कंपनीच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत.

ब्रिण्टनची दीर्घकालीन व्यवसाय योजना संशोधन व नवोन्मेषावर आधारित आहे. “उदयोन्मुख तंत्रज्ञानांमुळे औषधनिर्मिती उद्योगाच्या सीमा सातत्याने विस्तारल्या जात आहेत. तंत्रज्ञान व संशोधन यांच्यात अखंडित संगती राखून जागतिक बाजारपेठेतील स्थान भक्कम करणे ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. त्यातूनच लक्षावधी लोकांच्या अपूर्ण गरजा पूर्ण करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा उच्चदर्जाचा पोर्टफोलिओ तयार केला जातो,” असेही दर्डा यांनी सांगितले. कंपनीच्या महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यात हे आरअँडडी केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.