‘बुधभूषण’मधील संदेश उलगडणाऱ्या ‘विद्यार्थ्यांचे शंभूराजे’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन

33
पुणे : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजनीती शास्त्रावर आधारित चरित्र अभ्यासक निलेश रमेश भिसे यांनी लिहिलेल्या व स्नेहल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘विद्यार्थ्यांचे शंभूराजे’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार, दि. १० मे २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कुल, टिळक रोड पुणे येथे होणार आहे.

उरी सर्जिकल स्ट्राईकचे जनक लेफ्ट. जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहशतवाद्यांचे कर्दनकाळ माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे असणार आहेत. नक्षलवाद्यांशी लढा पुकारणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज शिरीषजी महाराज मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लेखक व अभ्यासक निलेश रमेश भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्राज भिलारे, समीर महाडिक, सुनील भगरे, विनय मानकर, प्रणव कुकडे, मंगेश बुजवे, दीपक महाडिक, ओंकार मेमाणे, प्रतीक गांजवे आदी उपस्थित होते.

निलेश रमेश भिसे म्हणाले, “शंभूराजांबद्दल विद्यार्थी आणि युवा पिढीमध्ये प्रचंड आकर्षण आहे शंभूराजांनी केलेला उपदेश युवा पिढी नक्की ऐकेल. शंभू राजांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये राजनीति शास्त्रावर मार्गदर्शन केले आहे. ते आत्ताच्या काळातही सर्वांसाठी उपयुक्त आहे. हाच विषय विद्यार्थ्यांचे शंभूराजे या पुस्तकात मांडला आहे. शंभू चरित्राचा प्रसार व्हावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. शंभूराजांच्या व्यक्तिमत्त्वातील एक वेगळा पैलू या पुस्तकात मांडला आहे.”