बापरे : महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीची 3 जणांकडून हत्या

135

बापरे : एका 42 वर्षीय व्यक्तीची हत्या (Murder) केल्याप्रकरणी तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली. राजन दास (Rajan Das) उर्फ बंगाली असे मृताचे नाव असून सचिन कवंदर, सदा कवंदर आणि भावेश साळवे असे या तीन आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृताने आरोपी कवंदरच्या पत्नीकडे 500 रुपये देऊन लैंगिक सुखाची मागणी केल्याने हा प्रकार घडला. मृतकाने कवंदर नावाच्या एका आरोपीच्या पत्नीकडे 500 रुपयांची ऑफर देऊन लैंगिक सुखाची मागणी केली होती, ज्यामुळे त्यांच्यात भांडण झाले आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, यात राजन दास याचा मृत्यू झाला.

आरोपी कवंदरच्या पत्नीने मृताच्या मागणीबद्दल तिच्या पतीला माहिती दिली. त्यानंतर त्याने बुधवारी त्याचा पुतण्या भावेश साळवे सोबत जाऊन दास यांच्यावर लाठ्या आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला. मृताला बेदम मारहाण करून आरोपींनी तेथून पळ काढला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर, राजन दास याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.