‘बहुढंगी दादा’मधून बहारदार, लोकप्रिय गीतांचा नजराणा

106
पुणे, २७ नोव्हेंबर २०२२ : अंजनीच्या सुता तुला देवाचं वरदान… वर ढगाला लागली कळ… माळ्याच्या मळ्यामंदी… गंगू तारुण्य तुझं बेफाम… हिल पोरी हिला… झाल्या तिन्ही सांजा… काय गं सखू, बोला दाजीबा… काल रातीला सपान पडलं… अशा बहारदार, लोकप्रिय गीतांचा नजराणा ‘बहुढंगी दादा’मधून पेश झाल्याने रसिकांमध्ये नवचैतन्य संचारले.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महाराष्ट्र हास्य योग परिषदेचा समारोप महक प्रस्तुत ‘बहुढंगी दादा’ या गायन मैफलीने झाला. गायिका मनीषा निश्चल, गायक जितेंद्र अभ्यंकर व मनीष आपटे यांच्या जबरदस्त सादरीकरणावर हास्यक्लब सदस्यांनी ठेका व ताल धरला. हास्यक्लबचे विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कलाकारांनी एकापेक्षा एक अशा लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले. प्रत्येक गाण्याला रसिकांकडून ‘वन्समोअर’ची मागणी होत होती. गायकांनी रसिकांची इच्छापूर्ती करत वातावरण आनंदमय केले. ‘डौल मोराच्या’, ‘मी तर भोळी अडाणी’, ‘चल र शिरपा’, ‘गेली कुठं घावना’, ‘होलीच सोंग घेउन’, ‘चंदनाच्या पाटावर सोन्याच्या’, ‘आई माझ्या लग्नाची’, ‘गालावरची खळी तुझ्या’, ‘लबाड लांडग ढोंग करतंय’, ‘काशी ग काशी तुझी सवय कशी’ अशी अजरामर गाणी सादर झाली. ‘आला थंडीचा महीना’ या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.
मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर, मनीष आपटे यांच्या बहारदार गायनाला तबल्यावर विशाल गंड्रतवार, ढोलकीवर केदार मोरे, ऑक्टोपॅडवर ऋतुराज कोरे, बासरीवर शैलेश देशपांडे आणि कीबोर्डवर अमन सय्यद व मिहीर भडकमकर यांची सुरेल साथसंगत लाभली.