प्रदीप रावत यांचे कार्य अतुलनीय : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

74

प्रदीप रावत यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ प्रदान

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने माजी खासदार प्रदीप रावत यांच्या वारकऱ्यांसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते रावत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आशा रावत उपस्थित होत्या.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “प्रदीप रावत यांचे काम अतुलनीय आहे. अत्यंत संयमी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक सेवा आणि राजकीय वाटचाल करीत असतानाच आजही त्यांचे पुस्तक वाचन आणि अभ्यास सुरू आहे. अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभत असून, त्यातून युवापिढी घडत आहे. विद्यार्थ्यांनी परिस्थितीच्या विद्यापीठाला सामोरे जायला हवे, ही त्यांची धारणा आहे.”

वारकऱ्यांसाठी पोर्टेबल शौचालयाची सुविधा, मैलापाणी व्यवस्थापन करून वारीचे चांगले नियोजन होण्यात त्यांचे योगदान आहे. या मैला पाण्यापासून शेतीला खत उपलब्ध करून देण्याचे काम रावत व त्यांची टीम काम करत आहे. स्वेच्छेने ही अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे काम स्वयंसेवकांच्या मदतीने करत आहेत. त्याची दाखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले.

प्रदीप रावत म्हणाले, “सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने झालेला सन्मान संस्मरणीय आहे. चांगले शिक्षण ही काळाची गरज असून, त्यानेच आयुष्य घडते. कोणीतरी सांगितल्यावर अभ्यास न करता स्वयंस्फूर्तीने अभ्यास केला पाहिजे. माणूसपण टिकवत मेंदूचा संरक्षक म्हणून वापर केला पाहिजे. आपण एक वेगळी सृष्टी निर्माण करण्याकरिता या मेंदूचा प्रभावी उपयोग करण्याची आवश्यकता आहे.”