विनाकारण फिरणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
पुसेगाव : करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन सुरू असतानाही काही नागरिकांना गावातून फेरफटका मारण्याचा मोह आवरताना दिसत नाही. या नागरिकांना वारंवार समज देऊनही त्यांचा गावांमधून स्वच्छंद विहार सुरूच आहे.
पोलिसांनी नागरिकांना वाहने जप्त करण्याचा इशारा दिल्यानंतरही विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्याची धडक कारवाई पुसेगाव पोलिसांनी सुरू केली आहे. पुसेगाव ता. खटाव येथील छत्रपती शिवाजी चौकात आज सकाळपासून पोलिसांनी वाहने जप्त करण्यास सुरुवात केली होती.
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य लोकांना वाहने वापरण्यास बंदी घातली गेली आहे. तरीही काहीजण आपली वाहने घेऊन बेजबाबदारपणे रस्त्यावर येत आहेत. अशा लोकांची २० वाहने पोलिसांनी जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली. तर, विनाकारण फिरणाऱ्या बुध ता. खटाव येथील एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना हा संसर्गजन्य रोग असून सामाजिक संपर्क टाळणे हे संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करुन, संचारबंदीच्या काळात घरातच थांबून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी गावांमधून विनाकारण भटकणे टाळावे असे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि विश्वजीत घोडके यांनी केले आहे.