पुण्यात उद्या सिंहगडावर सिंहगड हाफ मॅरेथॉनचे आयोजन; असा असेल मॅरेथॉनचा मार्ग

33

चला धावूया निरामय आरोग्यासाठी, चला धावूया सिंहगडावर…

स्वानंद डव्हेंचर ही ना नफातत्त्वावरील स्वयंसेवी संस्था असून, नागरिकांमध्ये आरोग्यासंबंधी जागृती करण्याचे काम करते.  यामध्ये मॅरेथॉन, सायकलिंग अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून येत्या 13 ऑगस्ट रोजी सिंहगड हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. 

संजीव शहा यांनी मॅरेथॉनच्या आयोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, “जगात अनेक ठिकाणी होणाऱ्या मॅरेथॉन या त्या ठिकाणच्या ऐतिहासिक स्थळांच्या महत्त्व सांगतात. पुणे हे देखील सिंहगडासाठी ओळखले जाते. यातून आपल्या शौर्याचा इतिहास जगाला समजतो. म्हणूनच या गडाचे स्थानमहात्म्य म्हणून सिंहगडावर मॅरेथॉन घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

मॅरेथॉनचा मार्ग : डोणजे ते सिंहगड असा मॅरेथॉनचा मार्ग असेल. मॅरेथॉनची सुरूवात आणि शेवट कृष्णाई वॉटर पार्कजवळ होईल. ही मॅरेथॉन 13 ऑगस्ट रोजी बरोबर पहाटे 5.45 वाजता सुरू होईल. यात सहभागी होणारे नागरिक किमान  21.1 तसेच 10 किलोमीटर धावू शकतील. निरामय आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण हा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे. सुमारे चारशे ते पाचशे नागरिक यात सहभागी होतील, असा अंदाज संजीव शहा यांनी व्यक्त केला.

मार्गावर सर्व सुविधा : मॅरेथॉन मार्गावरील दर दोन किलोमीटरवर पिण्याच्या पाण्याची सुविधा, एनर्जी ड्रींक, केळी. तसेच वैद्यकीय मदतीसाठी एक साधी रुग्णवाहिका आणि 2 कार्डियॅक रुग्णवाहिकेसह 26 डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट यांचे पथक, तसेच सर्व वैद्यकीय सुविधा या मॅरेथॉन मार्गावर उपलब्ध आहेत.

सिंहगड परिवार, फॉरेस्ट विभाग आणि ग्रामीण पोलिस दलातीव 50 स्वयंसेवक मदतीसाठी असतील. या दरम्यान धावणाऱ्या व्यक्तीस तातडीची वैद्यकीय गरज लागल्यास त्याला तातडीचे उपचार मिळावेत म्हणून रुग्णालयात दाखल करण्याचा सुविधा देखील  दिली जाणार आहे, असे संजीव शहा, विजय गायकवाड व साहील शहा यांनी नमूद केले.