आपल्या आजूबाजूला जर कुठे एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण होत असेल तर बघण्यात आनंद नक्कीच वाटतो, पण त्याहीपेक्षा आनंद त्यावेळी जास्त जाणवतो, ज्यावेळी आपण एखादा चित्रपट बघतो, आणि तो चित्रपट बघताना आपल्याजवळील एखादं ठिकाण आपल्याला त्या चित्रपटामध्ये बघायला मिळते. असे ठिकाण चित्रपटामध्ये बघण्यात आपणास मजा येते जे ठिकान प्रत्यक्षात बघण्यासाठी आपण खूप उत्सुक असतो.
समजा तुम्ही एखादा चित्रपट बघत आहात, आणि तो बघताना त्या चित्रपटात जी जागा दाखवली आहे ती जागा जर आपल्या रोजच्या व्यवहारातली जागा असेल, तर त्या क्षणी तुम्हाला किती आनंद होईल. ईथे आम्ही अशाच काही जागेवर चित्रीत झालेल्या चित्रपटांची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या चित्रपटांचे चित्रीकरण आपल्या पुण्यामध्ये झालेलं आहे. कुठल्या आहेत त्या जागा आणि कुठले आहेत ते चित्रपट जाणून घेऊयात.
अय्या

राणी मुखर्जी यांना घेऊन तयार करण्यात आलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात चित्रित झालेला आहे. यातील काही भाग पुण्यात चित्रित करण्यात आलेला आहे. या चित्रपटासाठी पुण्यातील संभाजी पुल, रास्ता पेठ आणी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अशा जागांची निवड करण्यात आलेली होती. यातील काही चित्रकरणात तुम्हाला पुण्यातील मंडईसुद्धा बघण्यास मिळते.
अंधाधून

या चित्रपटाचं चित्रीकरण कुठल्याही फिल्मसिटीमध्ये खूप कमी प्रमाणात करण्यात आले होते. या चित्रपटातील 90 टक्के चित्रिकरण हे पुण्यामध्ये करण्यात आले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एमजी रोड, शिषा कॅफे, मगरपट्टा, फर्ग्युसन कॉलेज रोड, कोरेगाव पार्क आणि पेठेतील काही भागही वापरण्यात आला होता. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानाचे घर प्रभात रोड येथे दाखवण्यात आले होते, आणि तब्बू ज्या ठिकाणी वास्तव्य करते ती जागा मगर पट्ट्यातील एक अपार्टमेंट दाखवण्यात आले होते. या चित्रपटामध्ये पुण्यातील संस्कृती दाखवण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आलेला आहे. या चित्रपटातील कॅफे गुडलक मात्र कोणीच विसरू शकत नाही.
तुंबाड

हा चित्रपट 2018 मध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एका गावातील स्वर्गीय शक्ती बद्दल असणाऱ्या कथेबद्दल दाखविण्यात आले आहे. खरे तर या चित्रपटातील गावाचे चित्रीकरण हे कुठल्याही गावात करण्यात आलेली नसून ते पुण्याजवळील पुरंदरे वाड्यात करण्यात आलेले आहे. या चित्रपटामध्ये पुण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, पण यातील पुणे मात्र सेट वरतीच चितारले होते.
बदलापूर

तुम्हाला क्राइम थ्रिलर म्हणून प्रसिद्ध असलेला वरून धवनचा बदलापूर चित्रपट आठवतोय का ? बदलापूर त्या वर्षीचा सर्वात उत्कृष्ट चित्रपट होता. यातील यामी गौतम आणि वरून धवण एकत्र असतानाचे चित्रकरण पुण्यातील कॅफे कोलंबिया मध्ये करण्यात आले होते. या चित्रपटातील बराचसा रात्रीचा भागही पुण्यातच चित्रित करण्यात आला होता.
बकेट लिस्ट

माधुरी दीक्षितने अनेक वर्षांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीमध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे. या चित्रपटांमध्ये तिला दुचाकी चालवताना दाखविले आहे. हे सर्व शूटिंग पुण्यातील प्रभात रोडवर करण्यात आलेले होते. या चित्रपटामध्ये असे दाखवण्यात आले आहे की माधुरी दीक्षित मूळची पुण्यातील आहे.
मेरे ब्रदर की दुल्हन

इम्रान खान आणि कॅटरिना कैफ यांनी काम केलेला हा भन्नाट चित्रपट होता. यातील सुरुवातीचं गाणं चित्रित करण्यात आलेलं आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर. गाण्याच्या चित्रीकरणासाठी खरंतर विमानतळ बंद करण्यात आलेल्या नव्हतं, म्हणूनच तर ते चित्रीकरण अगदी जिवंत वाटत होतं.
मुन्नाभाई एमबीबीएस

या चित्रपटाने संपूर्ण तरुणाईला भुरळ घातली होती. या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली जागा कुठलेही हॉस्पिटल किंवा वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. ही जागा पुण्यातील एग्रीकल्चर कॉलेजची जागा होती. तुम्हाला तो मोठा वर्ग आठवतोय का ? तो वर्गही त्याच एग्रीकल्चर कॉलेज ऑफ पुणे मधील आहे.
गांधी

या चित्रपटाचे चित्रीकरण आगाखान पॅलेस या ठिकाणी करण्यात आलेले आहे, कारण यासंबंधी एक खूप छान असा इतिहास आहे. या चित्रपटातील दाखवण्यात आलेले दक्षिण आफ्रिकेतील टाऊन हॉल म्हणजे फर्ग्युसन कॉलेज मधील एक मोठा हॉल आहे.
ना तुम जानो ना हम

हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फार कमाई करू शकला नाही, पण या चित्रपटामुळे ऋतिक रोशन आणि ईशा देवोल मात्र पुण्याला आले एवढं मात्र छान झालं. या चित्रपटातील काही चित्रीकरण पुण्यात करण्यात आलेले होते.
इंग्लिश विंग्लीश
.jpg)
या चित्रपटाची सुरुवातीची शूटिंग पूर्णपणे पुणे शहरामध्ये झालेली आहे. त्यातही त्यांचे जे घर दाखविण्यात आलेले आहे, ते पुण्यातील मॉडेल कॉलनीतील एक घर आहे. या चित्रपटातील स्वर्गीय श्रीदेवी यांनी केलेला शशि गोडबोले यांचा अभिनय प्रत्येकाच्या मनामध्ये कायमचं घर करून राहील.
हलचल

तुम्हाला तो विनोदी चित्रपट आठवतच असेलच. 2004 मध्ये करीना, अक्षय खन्ना आणि अर्शद वारसी यांना घेऊन तयार केलेल्या हा चित्रपट. या चित्रपटामध्ये इतरही अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलेले आहे. या चित्रपटाचेही चित्रीकरण काही प्रमाणात पुण्यात करण्यात आलेले आहे. यातील लॉ कॉलेजचे होस्टेल म्हणून दाखविण्यात आलेले ठिकाण, खरे तर पुणे विद्यापीठातील वस्तीगृह आहे.
अजब प्रेम की गजब कहानी

या चित्रपटामुळे अनेक प्रेमीयुगुलांना प्रेम करण्यास प्रोत्साहन नक्कीच मिळाले असेल. रणवीर आणि कटरीना कैफ यांना घेऊन तयार करण्यात आलेला हा रोमँटिक चित्रपट. यातील काही मुख्य सीन पुण्यात चित्रीत करण्यात आलेले आहेत. यातील “प्रेम की नैय्या” हे गाणेदेखील पुण्यात चित्रीत करण्यात आलेले आहे.
A Mighty Heart

तुम्हाला माहिती आहे की पुण्यात बॉलिवूडमधील चित्रपटांच चित्रीकरण करण्यात येतं. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि हॉलीवूडनेही चित्रकरण करण्यासाठी अनेक वेळेस पुण्याचा वापर केलेला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही पुणे हे शहर निवडले गेले होते. या चित्रपटामध्ये अँजलिना जोली या प्रसिद्ध अभिनेत्रीने काम केले होते. या चित्रपटाचं चित्रीकरण पुण्यातील नॅशनल हाउसिंग सोसायटी औंध मध्ये करण्यात आले होते.
बॉडीगार्ड आणि दंगल

तुम्ही हे दोन्ही चित्रपट नक्कीच पाहिले असतील. दंगल आणि बॉडीगार्ड या चित्रपटांचे चित्रीकरण “सिम्बॉयसिस लवाले कॅम्पस” मध्ये करण्यात आलेले आहे.
मेजर साब
नव्वदच्या दशकामध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट तुम्हाला लक्षात असेलच. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि अजय देवगन यांनी काम केलेले आहे. यातील दाखवण्यात आलेले महाविद्यालय पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे.
