‘पुणे डायबेटिक रन’ला उस्फुर्त प्रतिसाद

118

पुणे, २१ नोव्हेंबर,२०२२ : ‘पुणे डायबेटिक रन’ला पहिल्याच वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल २५० पेक्षा जास्त व्यक्ती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ३ किमी धावलेल्या ३ वर्षाच्या चिमुरड्यापासून ते ५ किमी धावलेल्या ८२ वर्षांच्या वृद्धेपर्यंत विविध वयोगटातील व्यक्तींचा यामध्ये समावेश होता. १० किमीच्या पहिल्या विभागाची सुरुवात सकाळी ६ वाजता झाली तर ५ व ३ किमी विभागांची सुरुवात अनुक्रमें २० व ४० मिनिटांनंतर झाली.

पुणे डिव्हिजनल कमिशनर श्री. सौरभ राव, सिनेक्षेत्र व प्रसिद्धीमाध्यमातील लोकप्रिय व्यक्ती विभावरी देशपांडे, श्रीरंग गोडबोले, कॉम्रेड्स मॅरेथॉन व विविध आयर्नमॅन स्पर्धा ज्यांनी पूर्ण केल्या आहेत अशा समृद्धी कुलकर्णी, आयर्नमॅन उमेश रानडे आणि ट्रायथलेट व लंडन-एडिनबर्ग-लंडन (एलईएल) २०२२ फिनिशर किरीट कोकजे यांनी देखील पुणे डायबेटिक रनमध्ये भाग घेतला.

निरोगी व सक्रिय जीवनशैली असणे महत्त्वाचे असल्याचे सांगून अलोहा क्लिनिक्सच्या संस्थापिका व संचालिका डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, “ऍथलिट्स आणि रुग्णांनी या रनला जो प्रतिसाद दिला आहे तो पाहून मी भारावून गेले आहे. निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करण्यावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यात पुणे डायबेटिक रन खूप मोठे योगदान ठरेल. रविवारी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अजून मोठ्या स्तरावर या रनच्या द्वितीय आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी मी व माझी टीम उत्सुक आहोत.”

जीवनशैलीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे अलोहा क्लिनिक्स आणि महिलांचे आरोग्य व स्वच्छता यासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था कपिला नारी यांनी संयुक्तपणे पुणे डायबेटिक रनचे आयोजन केले होते.