पिंपरी इंडियन्स, मंगतानी टायटन्सची विजयी सलामी

57

पुणे : पिंपरी इंडियन्स, मंगतानी टायटन्सची विजयी सलामी; आसवानी क्रिकेट कप क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये पिंपरी इंडियन्सने तिलवानी चार्जर्सचा, तर मंगतानी टायटन्सने डायमंड सुपरकिंग्जचा पराभव करत विजयी सलामी दिली. ‘ये है पिंपरी का त्योहार’ या संकल्पनेवर होत असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण १४ संघ खेळत असून, टी-१० असे स्पर्धेचे स्वरूप आहे. ‘आसवानी क्रिकेट कप’ या युट्युब व फेसबुक पेजवरून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होत आहे.

पिंपरी येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर २२ मे पर्यंत चालणाऱ्या ‘एसीसी २०२३’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले. प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्पर्धेचे प्रमुख संयोजक व आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी यांच्यासह १४ संघांचे मालक उपस्थित होते.

सिंधी समाजात खेळ आणि तंदुरुस्तीबाबत गोडी निर्माण करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. व्यवसायाबरोबरच खेळातही प्रगती करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरेल. पुणे व पिंपरीसह ठाणे, कल्याण, बारामती, सातारा, कर्नाटक, गुजरातमधील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचे श्रीचंद आसवानी यांनी सांगितले.

पिंपरी इंडियन्स आणि तिलवानी चार्जर्स यांच्यात पहिला सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना इंडियन्सने १० षटकांत ५ गडी गमावत ८१ धावा केल्या. ध्रुव मलिक याने दोन षटकारांसह १५ चेंडूत २२, सुरज रामचंदानीने दोन चौकार व एक षटकारासह १७ चेंडूत २२, तर धीरज दोडवानीने एक चौकार व षटकार लगावत १५ चेंडूत १७ धावा केल्या. हितेश दादलानी आणि पंकज रामवानी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. ८२ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चार्जर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पंकज रामवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. गौरव छाब्रियाच्या भेदक गोलंदाजीपुढे चार्जर्सचा डाव गडगडला. एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. गौरव छाब्रियाने ३ षटकांत ११ धावा देत ४ गडी बाद केले. निखिल जवारानी याने दोन, तर धीरज दोडवानी आणि महेश श्रॉफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. गौरव छाब्रियाला सामनावीराचा किताब देण्यात आला.

दुसऱ्या सामन्यात मंगतानी टायटन्सने प्रथम फलंदाजी करत १० षटकांत ८ गडी गमावत ८० धावा केल्या. मयूर ललवाणी याने ५ उत्तुंग षटकार आणि दोन चौकार मारत १९ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याला सलामीवीर पवन पंजाबीने ११ धावत करत साथ दिली. बिट्टूने ८ धावांत २, दक्ष खेमचंदानीने १८ धावांत २ गडी बाद केले. दीप चंदनानी व साहिल तेजवानी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. विजयासाठी ८१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या डायमंड सुपरकिंग्जच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली. दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाल्यानंतर ऋषी तेजवानीच्या ९ चेंडूत १२ धावा वगळता अन्य फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. मामाने ५ धावांत ३, बंटी मेंगनानीने ५ धावांत २, तर मयूर ललवाणी १२ धावांत २ गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा मयूर ललवाणी सामनावीराचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

पिंपरी इंडियन्स – (१० षटकांत) ५ बाद ८१ (ध्रुव मलिक २२, सुरज रामचंदानी २२, धीरज दोडवानी १७, हितेश दादलानी २-२२, पंकज रामवानी २-१६) विजयी विरुद्ध तिलवानी चार्जर्स – (७.५ षटकांत) ८ बाद ३५ (हितेश दादलानी ९, अंकुश मुलचंदानी ८, गौरव छाब्रिया ४-११, निखिल जवारानी २-३)

————–

मंगतानी टायटन्स – (१० षटकांत) ८ बाद ८० (मयूर ललवाणी ४४, पवन पंजाबी ११, बिट्टू २-८, दक्ष खेमचंदानी २-१८) विजयी विरुद्ध डायमंड सुपरकिंग्ज  (९.३ षटकांत) ८ बाद ४१ (ऋषी तेजवानी १२, बिट्टू ९, मामा ३-५, बंटी मेंगनानी २-५, मयूर ललवाणी २-१२).

या १४ संघांचा सहभाग

पिंपरी इंडियन्स (विशाल प्रॉपर्टीज), रत्नानी नाईट रायडर्स (रोझ ग्रुप), मंगतानी टायटन्स (कोमल असोसिएट्स), तिलवानी चार्जर्स (गीता बिल्डर्स), फ्रेंड्स वॉरियर्स (फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप), रॉयल चॅलेंजर्स वरुण (एसएसडी एक्स्पोर्ट्स), केसवानी किंग्ज इलेव्हन (हॉटेल राधाकृष्ण), वाधवानी सनरायझर्स (साई वैष्णवी असोसिएट्स), मोटवानी रॉयल्स (रोहित इन्फ्रा), आसवानी डेअरडेविल्स (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स), संत कंवरम लायन्स (विजयराज असोसिएट्स अँड लखवानी असोसिएट्स), देव टस्कर्स (सतनाम ड्रायफ्रुट्स), डायमंड सुपरकिंग्ज (एमएसव्ही स्टील अँड अल्युमिनियम) आणि रामचंदानी सुपरजायंट्स (एव्हीआर स्पेसेस) हे १४ संघ स्पर्धेत खेळत आहेत.

विजेत्यांना भरघोस बक्षिसे

विजेत्या संघाला ५,५५,५५५/-, तर उपविजेत्या संघाला ३,३३,३३३/- रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक दिला जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी चेतक स्मार्ट इलेक्ट्रिक स्कुटर, हॅट्रिक विकेटसाठी १,०१,०००/-, हॅट्रिक सिक्सेससाठी ५१,०००/-, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी १०,०००/-, प्रत्येक सिक्ससाठी १०००/-, प्रत्येक चौकारासाठी ५००/- रुपये बक्षीस दिले जाणार आहे, असेही श्रीचंद आसवानी यांनी नमूद केले.