कोल्हापूर : पाणीपुरीच्या गाडीवर सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतील पाणी वापरलं जातं असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. रंकाळा चौपाटी परिसरात हा गलिच्छ प्रकार उघडकीस आला आहे.
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर या परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याच्या गाडीची अज्ञात तरुणांनी नासधूस केली.
कोल्हापूर शहरातील एक महत्त्वाचे पर्यटन ठिकाण असलेल्या खराडे कॉलेजसमोरील रंकाळा तलाव परिसरातील पाणीपुरी विक्रेत्याचा गलिच्छ कारभार समोर आला.
हा पाणीपुरी विक्रेता हातगाडीवर शौचालयाच्या टाकीतील पाण्याचा वापर करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हेच पाणी ग्राहकांसाठी पिण्यासाठी ठेवलं जात होतं.
कोरोनाच्या संकट काळात सुरु असलेल्या या जीवघेण्या प्रकाराविरोधात सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. व्हिडिओ व्हायरल होताच अवघ्या काही तासात भागातील नागरिकांनी संबंधित हात गाडी चालकाला कोल्हापूरी हिसका दाखवत त्याचा ठेला उध्वस्त केला.
त्याच्या गाडीवरील पाणी रस्त्यावर फेकले. त्याचा गाडा उलटवला त्यामुळे रस्त्यावर पाणीपुरीचा खच साचला होता.
परप्रांतीय व्यावसायिकाकडून अनावधानाने हे पाणी पिण्यासाठी वापरलं गेलं असले, तरी शौचालया शेजारी महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची टाकी असल्याचा दावा रंकाळा परिसरातील विक्रेत्यांनी केला आहे.
त्यामुळे सोशल मीडियात एखादा व्हिडिओ टाकण्याआधी पडताळणी करावी असे आवाहन या विक्रेत्यांनी केलं.