पुणे : नवव्या जागतिक योग दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसमध्ये ‘सिद्ध मंत्रा हास्य क्युरेटीव्ह योगथॉन २०२३’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. सलग सहा तास सुमारे २००० कर्मचारी व विद्यार्थी व सहयोगी सभासदांनी संकुलामध्ये, तसेच ऑनलाईन हास्य व सिद्ध मंत्र योग केला. यामध्ये एक तास सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विजेत्या पाच विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त युनिक वर्ल्ड रेकॉर्ड इनिशिएटिव्ह आणि सिद्धासन १२० मिनिट्स मूलाधार चक्र आसन परफॉर्मिंग वर्ल्ड रेकॉर्ड इनिशिएटिव्ह या दोन विश्व विक्रमांची या अनोख्या सिद्ध मंत्रा हास्य क्युरेटिव्ह योगथॉन-२०२३ मध्ये नोंद झाली. योग, हास्य, सिद्ध मंत्रा मूलाधार चक्र, सूर्यनमस्कार अशा विविध प्रकारांचा यात समावेश होता. नवीन जीवनशैलीत जगणाऱ्या मुलांसाठी अशा स्वरूपाचा उपक्रम सातत्याने व्हायला हवा. सूर्यदत्तमध्ये असे उपक्रम सातत्याने राबवले जातात. सूर्यदत्तच्या या भारतीय जीवनशैलीला पुरस्कृत करण्याच्या परंपरेचा उपयोग सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक, सांस्कृतिक स्तरावर होतो. विद्यार्थ्यांच्यात भारतीयत्वाचा अभिमान हा या कार्यक्रमाचा विशेष पैलू असतो.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून या योगथॉनला सुरुवात झाली. मुलाधार चक्र आसन सर्वाधिक वेळ, सर्वाधिक लोकांनी योग करण्याचा विक्रम स्थापित केला. सुमारे २००० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यामध्ये प्रत्यक्ष, तसेच ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. शालेय ते पीएचडीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, असोसिएट्स यांचा यावेळी समावेश होता. बन्सीरत्न सभागृह व लाईव्ह एलईडी टीव्हीच्या माध्यमातून ही योगासने झाली. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या संकल्पनेतून उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम आयोजिला होता.
यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा यांनीही सर्वांसोबत पूर्णवेळ योग प्रात्यक्षिके केली. योग आणि स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी वेळोवेळी या प्रत्यक्ष योग्य करणाऱ्या प्रत्येकाकडे जातीने लक्ष देत होते. कोण दमले आहे, नाडीचे ठोके या सर्वांकडे जातीने लक्ष दिले गेले. हा उपक्रम ऐच्छिक होता. कोणीही स्वतःवर जबरदस्ती करू नये, अशा सूचना दिल्या जात होत्या. यावेळी संचालक अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, शीला ओक, वंदना पांडे, डॉ. सीमी रेठरेकर, प्रशिक्षिका सविता गांधी यांच्यासह संस्थेचे संचालक,प्राचार्य , शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सिद्ध मंत्रा हास्य क्युरेटीव्ह योगथॉन २०२३’ मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात आले. सूर्यनमस्कार स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार ते एक हजार असे रोख बक्षिस देण्यात आले. यात विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी राधेश्याम लोहिया (प्रथम), गणेश नामदेव मेगावत (द्वितीय), दर्शन पूजन नहार (तृतीय), विपुल सुवालाल शिंदे (चतुर्थ), शिवनाथ राजाभाऊ काशीद (पाचवे) यांनी सर्वाधिक व योग्यरित्या सूर्यनमस्कार करून पहिली पाच पारितोषिके पटकावली. या कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक्समध्ये होणार आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
सिद्धेश्वर द पॉवर ऑफ सोलच्या संचालक नम्रता मेहता यांनी सिद्धासन योग सादर केला. नम्रता मेहता म्हणाल्या, “सिद्धेश्वर सिद्धासन महिला साधक सिद्धेश्वर – आत्म्याची शक्ती (सिद्धासन) हा एक प्रमुख जीवनशैली कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश तुम्हाला तुमच्या अंतरंगाचा पुन्हा शोध घेण्यास आणि मौनाच्या शक्तीचा वापर करून तुमच्या अस्सल अस्तित्वाशी पुन्हा जोडण्यात मदत करण्यासाठी आहे. सिद्धासन हा प्रबोधनाचा प्रवास आहे आणि लंगर म्हणजे मौन होय. हा एक निवासी शांतता कार्यक्रम आहे, जो तुमची चेतना अवचेतन जगण्यापासून उच्च जागरूक जीवनापर्यंत वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी, सहभागींना अधिक समाधान वाटते आणि आनंदाच्या खोल भावनेने ते निघून जातात. मूलाधार चक्रावर ध्यान केल्याने एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी, स्थिरतेची, शांततेची भावना निर्माण होते, जे आनंदी आणि संतुलित जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे.”
“सात चक्रांपैकी मूलाधार (मूळ चक्र म्हणूनही ओळखले जाते) हे मूलभूत आणि पहिले चक्र आहे. प्रत्येक व्यक्तीला परम आनंदाच्या महासागरात खोलवर जाण्यासाठी एक चाक प्रदान करते. जेव्हा आपण आपल्या मूळ ऊर्जेचा साक्षीदार होऊ शकतो, तेव्हाच तिला वैश्विक सुपर चेतनाकडे नेणे शक्य आहे. मूळ चक्र हा कुंडलिनी उर्जेचा म्हणजेच आपल्यातील जीवनशक्तीचा साठा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
लोकमान्य हास्ययोग संघाच्या वतीने बंडोपंत फडके, शरद महाबळ, प्रभा भालेराव आणि शोभा बहिरट यांनी हास्य योग सादर केला. मुलांशी नात-नातूंचे नाते जोडत त्यांनी हास्याचे फवारे उडविले. जीवनातील अनेक अडचणींना सामोरे जाताना हास्य उपयोगी पडते, असे त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आज संस्थेत सलग पाच तासाहून अधिक काळ सामूहिकरीत्या योग करण्यात आला. यामध्ये सिद्धासन योग, हास्य योग, सूर्यनमस्कार आदींचा समावेश होता. तंदुरुस्त राहणे, उत्साही असणे यासाठी योग जरुरी आहे. योगाचे खरे सार अनुभवायला हवे. योगामुळे मन, शरीर आणि आत्म्याला सखोल लाभ मिळतो. अधिकाधिक आरोग्य आणि चैतन्यासाठी मन-शरीर-आत्मा याबद्दल व्यावहारिक, जीवन वर्धक योगिक भारतीय शहाणपण आणि अंतर्दृष्टी मिळवणे गरजेचे आहे. मौन हा आत्म्याचा स्वभाव आहे. हे सत्र योग, तीव्र श्वासोच्छवासाचे कार्य, ध्यान आणि उच्च कंपन असलेल्या मंत्र बीट्ससह उपचारात्मक हालचालींच्या विलक्षण अनुभवासाठी वेगळे आहे, जे प्रत्येक व्यक्तीला सामूहिक शुद्ध चेतनेच्या उच्च स्तरावर जाण्यासाठी शरीर, मन आणि आत्म्यामध्ये त्वरित बदल अनुभवण्यास मदत करते.”
प्रशांत पितालिया यांनी सूत्र संचालन केले