धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात : मधुकर शिंदे

212

पुणे: राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेल्या धनगर आरक्षणासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात असून समाजाला निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वास अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष व निवृत्त पोलीस महासंचालक मधुकर शिंदे यांनी व्यक्त केला.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी मंचाच्या वतीने शिव पार्वती सभागृह, कोंढवा येथे आयोजित मेळाव्याचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सोपानराव काळे, खजिनदार पांडुरंग धायगुडे, सरचिटणीस डॉ. जे पी बघेल, राज्य संघटक चंद्रशेखर सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सुमारे अडीच हजार समाज बांधव उपस्थित होते.

धनगड या अस्तित्वहीन समाजाऐवजी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळणे सन १९५६ च्या घटनादुरुस्तीनुसार अपेक्षित होते. मात्र सरकार दरबारी न्याय न मिळाल्याने अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या वतीने सन १८३७ पासूनचे पुरावे गोळा करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सन २०१७ पासून ३३वेळा सुनावणी झाली असून न्यायालयीन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच न्यायालय आपला निर्णय देईल आणि धनगर समाजाला न्याय मिळेल, असे शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या लवकरच जिल्हा, तालुका, शहर, ग्राम, वॊर्डस्तरीय समित्या स्थापन करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल, असे काळे यांनी यावेळी सांगितले. पारंपरिक शेळी, मेंढीपालन व्यवसायाच्या समस्या दूर करण्याबरोबरच युवकांना नवे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे, दुर्गम भागातील अभावग्रस्त समाजबांधवांचे जीवनमान सुधारणे, धनगर समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व वाढविणे, समाजाच्या पोटजातींचा अभ्यास करून त्यांना कायदेशीर अधिकार मिळवून देणे अशी उद्दिष्ट मंचाने ठेवली आहेत, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

धायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. शेजाळ यांनी आभार मानले.