देशातील विविध समस्यांवर एक लाख युवक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिणार पत्र

50
One lakh youth will write letters to Prime Minister Narendra Modi on various issues of the country

पुणे : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या समस्या, भारतीय संविधानाची होत असलेली पायम्मली, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील सूडभावनेने केलेली कारवाई यासह देशांतील समस्यांवर राज्यातील एक लाख युवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पुढाकारातून ही एक लाख पत्रे पाठविण्यात येणार असून, या अभियानाची सुरुवात सोमवारी पुण्यात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांच्या हस्ते पोस्टात पत्र टाकून झाली. यावेळी दीडशे युवकांनी पत्रे पाठवली.

टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय येथे दीडशे ते दोनशे युवकांनी पत्रे लिहिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मीतेंद्र सिंग, महासचिव वैष्णवी किराड, प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, रोहन सुरवसे, सचिव कान्होजी जेधे, आशिष व्यवहारे, पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, शहरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीनिवास बी. व्ही. म्हणाले, “देशात बेरोजगारी, महागाई आणि सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी गौतम अदानी यांच्यासारख्या मित्रांचे भले करण्यात दंग आहेत. अदानींचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या विरोधात, तसेच जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे.  विरोधकांचा आवाज दाबून, त्यांना तपास यंत्रणेच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवून संविधान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. युवक काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही. जनतेच्या प्रश्नावर जाब विचारण्याचे काम देशातील युवकांनी करावे.”