दिव्यांगांच्या गायन मैफलीने जिंकली श्रोत्यांची मने

17
पुणे : ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘नन्हा मुन्ना राही हूँ’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला’, ‘जयोस्तुते श्री महान मंगले’, अशी देशभक्तीपर व स्फूर्तिदायक गीते… ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘किती गोड गोड नाव तुझे विठ्ठला’, ‘जय जय रामकृष्ण हरी’ अशी गोड भजने… ‘नानी तेरी मोरनी को मोर ले गए’, ‘नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा’, ‘नाच रे मोरा’ अशी बालगीते, ‘गगन सदन तेजोमय’ मधून केलेले लतादीदींना अभिवादन, गणेशाचे स्वागत करणारे ‘सोन पावलांनी आले बाप्पा’, आई-लेकराच्या नात्याची वीण उलगडणारे ‘एकटी एकटी घाबरलीस ना आई’ अन मातीच्या लेकरांचे वर्णन सांगणारे ‘आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं’ सुरेल आवाजात सादर करत दिव्यांग विद्यार्थ्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.
सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना गाता यावे, त्यांना आपल्या सुप्तगुणांना प्रकट करता यावे व त्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उद्देशाने लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या सहयोगी क्लबच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समूहगीत स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट, पर्ल, प्राईम, शिवाजीनगर, इको फ्रेंड्स, कोथरूड व ट्वेंटी फस्ट सेंच्युरी या क्लबचा यामध्ये पुढाकार होता. स्पर्धेत सात शाळा, सहा कार्यशाळा व तीन पुनर्वसन केंद्रातील एकूण १६ गट सहभागी झाले होते. २२५ कलाकारांनी आपली गायन कला सादर केली.
‘स्वरबंध’चे संचालक धनंजय आपटे व स्मिता आपटे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. लायन्स क्लबचे प्रांतपाल विजय भंडारी, माजी प्रांतपाल राजकुमार राठोड, क्लबचे पदाधिकारी शाम खंडेलवाल, आनंद आंबेकर, स्पर्धा प्रमुख सीमा दाबके, बलविंदरसिंग राणा, दर्शन राणा, माधुरी पंडित, किशोर मोहोळकर, सतीश राजहंस, युवराज लांबोळे, राजश्री जायभाय, राजेंद्र शेवाळे, शीतल गादिया आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
विजय भंडारी, राजकुमार राठोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळा गटातून सेवासदन दिलासा केंद्र, लक्ष्मी रोड, कार्यशाळा गटातून साई संस्कार, निगडी, तर पुनर्वसन केंद्र गटातून नवक्षितिज तळेगाव यांना प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक साई संस्कार, निगडी (शाळा गट), जीवनज्योत उद्योग केंद्र नळ स्टॉप (कार्यशाळा गट), जीवनज्योत (पुनर्वसन केंद्र) यांना, तर तृतीय क्रमांक जीवनज्योत, नळ स्टॉप (शाळा गट), गुरुकृपा, कर्वेनगर (कार्यशाळा गट) व नव क्षितिज मारूंजे (पुनर्वसन केंद्र) यांना तृतीय क्रमांक मिळाला. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. प्रतिभा खंडागळे यांनी सूत्रसंचलन केले तर डॉ. शीतल बागुल यांनी आभार मानले.
सीमा दाबके म्हणाल्या, “समूहगीत स्पर्धेचे हे तेरावे वर्ष आहे. सर्वच शाळांमध्ये संगीताचे शिक्षक असतातच असे नाही. त्यामुळे या विशेष विद्यार्थ्यांची अडचण होते. मात्र त्यावरही मात करत विद्यार्थ्यांनी छान सादरीकरण केले. स्पर्धेतील विद्यार्थ्यानी न डगमगता सुंदर आवाजात गाणी म्हटली. दिव्यांग विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यात ‘आम्ही पण करू शकतो’ हा आत्मविश्वास रुजवण्यासाठी दरवर्षी या  स्पर्धेचे आयोजन केले जाते.”