डॉ. सदानंद मोरे, इंद्रजित भालेराव, मंगेश काळे, मोनिका गजेंद्रगडकर यांना ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कार जाहीर

74
पुणे, दि. ७ : राजारामबापू पाटील ललित कला अकादमी, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने स्वर्गीय बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारे ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ अकादमीचे संस्थापक मार्गदर्शक, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अनुमतीने अकादमीचे निमंत्रक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रदीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले. सन्मान पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व कलाक्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.
साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे (पुणे) यांना ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवनगौरव सन्मान’ जाहीर झाला असून, रू. ५० हजार, सन्मानचिन्ह व मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप आहे. समकालीन चित्रकलेतील गुणवत्तापूर्ण योगदानाकरिता प्रसिद्ध चित्रकार मंगेश नारायणराव काळे (सोयगाव, औरंगाबाद), समकालीन कवितेतील गुणवत्तापूर्ण निर्मितीकरिता प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव (परभणी) आणि कथा साहित्यातील गुणवत्तापूर्ण निर्मितीकरिता प्रसिद्ध कथालेखिका मोनिका गजेंद्रगडकर (मुंबई) यांची ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रत्येकी रु. २५ हजार, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या सन्मानाचे स्वरुप आहे.
प्रदीप पाटील म्हणाले, “महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये माणसाच्या हिताचा मूल्यात्मक विचार घेवून आपल्या रचनात्मक कार्याने शिक्षण, सहकार, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रांचा विकास साधणाऱ्या राजारामबापू पाटील यांच्या विचारांची जोपासना व प्रसार राष्ट्रीय पातळीवर करण्याच्या भूमिकेतून अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. ललित कलांच्या माध्यमातून समाजाचे सांस्कृतिक उन्नयन करणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान व्हावा, त्यांनाही स्वर्गीय बापूंच्या ध्यासपूर्ण जीवनातून निर्मितीच्या वेगळ्या वाटा उलगडत जाव्यात; या उदात्त हेतूने या सन्मान पुरस्काराचा उपक्रम हाती घेतला आहे. साहित्यासह संगीत, चित्र, शिल्प, नृत्य अशा ललित कलांमधील व लोककलेतील कलावंतांचे योगदान विचारात घेवून प्रतिवर्षी हे सन्मान दिले जातील”
साहित्याचे अभ्यासक डॉ. संजय करंदीकर, कासेगांव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, स्वीय सहाय्यक मोहन चव्हाण, प्रकाशक सुनिताराजे पवार, उद्योजक सुनिल चव्हाण, सतीश पाटील, साहित्यिक जगदीश कदम, डाॅ. राजेंद्र माने, प्रा. मिलींद जोशी, उद्धव कानडे, डॉ. संदीप सांगळे, विश्वनाथ पाटसुते यांच्यासह महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील मान्यवरांचा अकादमीच्या कार्यकारिणी व सल्लागार समितीमध्ये समावेश आहे. अकादमीतील मान्यवर यांबरोबरच संजय ऐलवाड, वसंत पाटील, रघुराज मेटकरी, डाॅ. अनिल मडके, अंजली कुलकर्णी, मनीषा पाटील, प्रा. संजीवनी वाघ, अनंत कदम, सुरेश आडके, सुभाष कवडे आदी साहित्यिक सदस्य समारंभाच्या यशस्वी संयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.