‘डिजिटल डेन्टिस्ट्री’च्या अभ्यासक्रमासाठी शासन सहकार्य करेल : चंद्रकांत पाटील

76

पुणे, १९ नोव्हेंबर २०२२ : “डिजिटल डेन्टिस्ट्री झपाट्याने विकसित होत असलेली अत्याधुनिक वैद्यकीय शाखा आहे. डिजिटल डेंटिस्ट्री अधिक लोकाभिमुख व्हावी व या क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार व्हावेत, यासाठी डिजिटल डेंटिस्ट्रीचा अभ्यासक्रम सुरु करावा. राज्य शासन त्यासाठी लागणारी जागा व अन्य पायाभूत सुविधा आणि परवानग्या असे सर्वतोपरी सहकार्य करेल,” असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीच्या वतीने आयोजित ‘प्रगत दंतोपचार व दंतरोपण’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. प्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, इंडियन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पंकज चिवटे, सचिव डॉ. रत्नदीप जाधव, खजिनदार डॉ. विजय ताम्हाणे, सहसचिव डॉ. केतकी असनानी, सहखजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. संजय असनानी, डॉ. सुरेश लुधवानी आदी उपस्थित होते. भारतासह इतर बारा देशांतून ८०० पेक्षा अधिक दंतचिकित्सक, तंत्रज्ञ, कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आदी सहभागी झाले आहेत.

“तंत्रज्ञानाने दंत चिकित्सेत अत्याधुनिक उपचार विकसित होत आहेत. हे उपचार लोकांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध व्हावेत. त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर, विकसित तंत्रज्ञान, इनोव्हेशन व्हायला हवे. यासाठी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीने पुढाकार घ्यावा. या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशांतून डॉक्टर सहभागी झाले असल्याने परस्परांत विचार, उपचार पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान याची देवाणघेवाण होईल. त्यातून डिजिटल डेंटिस्ट्री आणखी प्रगल्भ होण्यास मदत होईल.”

प्रशांत गिरबने म्हणाले, “डिजिटल हेल्थ हा डिजिटल इंडियाचा एक महत्वाचा घटक आहे. कोविन, ई-संजीवनी, टेलिमेडिसीन, मेडिकल डिव्हाइसेस यामुळे आरोग्य सुविधा अधिक जलद, सोप्या व सहज होत असल्याचे पाहिले. डिजिटल इंडियामुळे लाभार्थ्याला थेट मदत मिळणे शक्य होत आहे. आरोग्य क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हायचा असेल, तर आपल्याला अधिक प्रमाणात संशोधन, इनोव्हेशन करावे लागेल. या आंतरराष्ट्रीय परिषदेतून या कार्याला गती मिळेल. भारतात स्टार्टअप संस्कृती लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करीत आहे. त्यातून करोडो लोकांना लाभ होत आहे.”

डॉ. पंकज चिवटे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात दंत चिकित्सेत आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. हे प्रगत दंतोपचार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी या परिषदेचा लाभ होईल. दंतचिकित्सक, तंत्रज्ञान बनवणाऱ्या कंपन्या आणि संशोधक एकत्र येऊन डिजिटल डेंटिस्ट्रीवर चर्चा करत आहेत. डॉ. रत्नदीप जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुचेता वंजारी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी आभार मानले.