जो बायडेन आणि आणि कमला अक्कांच्या नावाचे पुण्यात बॅनर; सर्वत्र चर्चा

196

पुणे | पुण्यात पोस्टरबाजी आणि हटके पुणेरी पाट्यांची नेहमीच चर्चा सुरु आहे. सध्या असेच एक बॅनर पुण्यात लागले आहे ज्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना शुभेच्छा देण्यासाठी हे पोस्टर लावले आहे. या शुभेच्छा खास पुणेरी शैलीत दिल्या असून या पोस्टरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी जो बायडेन आणि उपराष्ट्रपतीपदासाठी कमला हॅरिस यांचा काल (ता. २०) शपथविधी झाला. त्यानंतर त्यांच्या निवडीचे अभिनंदन करणारे हटके बॅनर पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात झळकले आहेत. सध्या या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.

अमेरिकेत जो बायडेन यांच्या सत्तास्थापनेसोबत नवीन इतिहास रचला गेला. राष्ट्रपती म्हणून जो बायडेन यांनी तर उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरीस यांनी शपथ घेतली. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत. कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या असून त्यांची अमेरिकेच्या ४९व्या उपराष्ट्रपदीपदी नियुक्ती झाली आहे. अमेरिकेतील जो बायडेन आणि कमला हॅरीस यांचे अभिनंदन करण्यासाठी पुण्यातील भारती विद्यापीठ महाविद्यालयाजवळ असणाऱ्या पादचारी पुलावर फ्लेक्स लावण्यात आले आहे.

जो भाऊ बायडेन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आणि भारतीय वंशांच्या कमला अक्का हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी तसेच भारतीय वंशांच्या १४ मंत्र्यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! घासून नाय ठासून आलोय अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर झळकत आहे. शिवप्रेमी पोपटराव जयंतराव खोपडे यांनी यांनी त्यांचे स्वागत केल्याचे दिसून येत आहे. त्यांनीच हे बॅनर लावल्याचा अंदाज आहे. सध्या पुण्यात या फ्लेक्सची मोठी चर्चा सुरू असून त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सध्या शहरामध्ये हे फ्लेक्स चर्चेचा विषय बनले आहेत.