जयंतराव सहस्रबुद्धे यांचे जीवन, संघटन कौशल्य आदर्शवत

32

पुणे : “जयंतराव सहस्रबुद्धे शोधक, तर्कशुद्ध मांडणी करणारे, तत्वज्ञान जगणारे आणि कोणत्याही गोष्टीच्या मूलभूत उत्पत्तीकडे जाणारे व्यक्तिमत्व होते. कालिदासाने वर्णन केलेली संत संकल्पना जयंतरावांना तंतोतत लागू पडते. प्रचारकी जीवनाचा ते आदर्श होते. अनुशासन, संघटन कौशल्य, शिस्त याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या जयंतरावांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा भावना विविध मान्यवरांनी काढले

विज्ञान भारतीचे संघटन सचिव व ज्येष्ठ संघ प्रचारक जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या श्रद्धांजली सभेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नुकतेच आयोजन केले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे अँफी थिएटर मध्ये आयोजित सभेत जयंतरावांच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शोक संदेशाद्वारे श्रद्धांजली वाहिली.

यावेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य अनिरुद्ध देशपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे, विज्ञान भारतीचे प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, ‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय अधिकारी शिरीष राव भेडसगावकर, जयंतरावांचे धाकटे बंधू विनायक सहस्रबुद्धे, विज्ञान भारतीच्या कार्यकर्त्या शर्वरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. शेखर मांडे यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले की, जयंतरावांनी देशभरात कामासाठी केलेल्या प्रवासाच्या ठिकाणची कुटुंबे आपलीशी केली. आपले विज्ञान लोकांसमोर मांडून त्याबद्दल आदर निर्माण करण्याचे कार्य करण्याची प्रेरणा ते सतत देत होते. भारतीय विज्ञानाला देखील इतिहास आहे. हा इतिहास गौरवशाली सांगायला हवा, असे ते म्हणत, प्रफुल्लचंद्र रे, विवेकानंद यांच्याविषयी त्यांचा उत्तम अभ्यास होता.”

डॉ. आशिष लेले म्हणाले, “माझी ‘एनसीएल’च्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘कोविड’ काळातही ते मला भेटायला आले. पहिल्याच भेटीत अर्ध्या तासाच्या बैठकीत त्यांनी मला खूप प्रभावित केले. त्यांच्याकडे तल्लख बुद्धिमत्ता होती. मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व, विद्वान, तत्वज्ञानी, तत्वनिष्ठ असा हा माणूस होता.”

शरद कुंटे म्हणाले, “जयंतराव प्रत्येक घटनेशी एकरूप व्हायचे. त्यांनी विज्ञान भारताशी जोडून काम पुढे नेले. स्वामी विवेकानंदांविषयी त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांनी श्रद्धा व निष्ठेने आपले काम केले. नेमकेपणा, सातत्य, अभ्यास हे त्यांचे वैशिष्ट्य होते.”

विनायक सहस्त्रबुद्धे म्हणाले, “जयंतदादा १९८९ मध्ये प्रचारक झाल्यावर पहिल्यांदाच नऊ महिने एकत्र राहण्याचा योग आला. त्यांच्यासोबत राहण्याचे भाग्य लाभले. घरातल्या आणि शाखेचा संस्कार परिपाक म्हणून त्यांच्यात सेवाभाव निर्माण झालेला होता.”

प्रा. आर. व्ही. कुलकर्णी म्हणाले, “जयंतरावांनी कार्याचा बडेजावपणा कधी केला नाही. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. अनेकांना कामासाठी प्रेरणा दिली. विज्ञान भारतीत आल्यावर अनेक शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा, शिक्षण संस्था, विज्ञान संस्था त्यांनी जोडल्या.”

शिरीष भेडसगावकर यांनी आपल्या प्रचारकी आयुष्यातील जयंतरावांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. लीना बावडेकर यांनी आपला कौटुंबिक स्नेह आणि जिव्हाळ्याबाबत आठवणी जागवल्या. डॉ. नितीन करमरकर यांनी नवे शैक्षणिक धोरण लागू होत असताना जयंतरावांची उणीव भासत असल्याचे सांगितले.

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, “जयंतरावांचे उत्तुंग विचार, त्यांचे अनुभव, व्यक्तिमत्व अनुशासनप्रिय होते. कार्यकर्त्यांसोबत त्यांचा व्यवहार उत्तम होता. अलिप्तपणा असूनही कधीही प्रेमाचा अभाव नव्हता. कर्तव्याप्रती कर्मठता असली, तरी वागण्यात तुटकपणा नव्हता.” डॉ. मानसी माळगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

——————————————————————————————————
“जयतारावांचे जाणे म्हणजे संघाच्या कार्यकर्त्यांवर वज्राघात होता. त्यांचा अपघात झाल्याची वार्ता मिळाली. त्यानंतर ते पुन्हा कामात येतील. त्यांचे सानिध्य मिळेल असे वाटत होते. पण, लाखों स्वयंसेवकांच्या प्रार्थनेनंतरही दुर्दैवाने दुखद घटना घडली. कार्यकुशलता, मधुर स्वभाव, स्मितवदन, गायन, समर्पण, नेतृत्व कुशलता हे त्यांचे विशेष गुण होते.”
– डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

——————————————————————————————————