घानामध्ये ‘मिलेट्स मॉडेल फार्म’ स्थापन करण्याच्या यूपीएल आणि रिपब्लिक ऑफ घाना यांनी हातमिळवणी केली

75

शाश्वत कृषी उपाय योजनांचा एक आघाडीचे प्रदाते यूपीएलने २०० एकर जमिनीवर ‘मिलेट्स मॉडेल फार्म’ ची स्थापना करण्यासाठी रिपब्लिक ऑफ घाना सोबत सहभागीदारी करण्याची घोषणा केली आहे. यूपीएल समूहाचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जय श्रॉफ आणि रिपब्लिक ऑफ घानाचे कृषीमंत्री माननीय श्री. झुल्फिकार मुस्तफा यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी घानातील जॉर्जटाऊन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, ज्याचा उद्देश वेगवेगळ्या भरड धान्यांच्या प्रकारांना  घानामध्ये पिकवण्यासाठी आणि वापरण्यासाठी त्यांच्या अनुकूलतेचे मूल्यमापन करणे हा आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माननीय श्री. एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली एका भारतीय शिष्टमंडळाने घानाला भेट देऊन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

     या भागीदारीमध्ये यूपीएल तांत्रिक कौशल्य आणि शेतीतील निवडक कच्चा माल पुरवेल तर घानामध्ये या प्रयोगास अनुकूल व योग्य अशी २०० एकर जमीन आणि शेतीच्या कामकाजासाठी स्थानिक कामगार व अन्य सहाय्य रिपब्लिक ऑफ घाना उपलब्ध करून देईल.

     भरड धान्यांना सुपर फूड म्हणून ही ओळखले जाते. ते शाश्वत आणि हवामान स्मार्ट (म्हणजे ते वाढते तापमान आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीतही तग धरू शकतात) पीके असून ते समृद्ध वारसा असलेले अत्यंत पौष्टिक अन्न स्त्रोत आहेत. तांदळाच्या तुलनेत भरड धान्यांना प्रति एकर निम्मे पाणी लागते, ज्यामुळे ते एक जलसंधारण करणारे पीक ठरते. तसेच इतर पिकांच्या तुलनेत दुष्काळ, पूर, उष्णतेचा ताण, अनियमित पर्जन्यमान इत्यादी सारख्या हवामान परिस्थितींना ते उत्तम प्रकारे तोंड देऊ शकतात, ज्यामुळे अन्न हानी कमी होते व लहान शेतकऱ्यांची लवचिकता जास्त वाढते.

     एफएओ (FAO) नुसार या भरड धान्यांमध्ये बाजरी, ज्वारी, राळा, हळवी, वरई, नाचणी, कोद्र, शामुळ, माक्रा तसेच जिनिया, फोनिओ आणि टेफ अशा विविध प्रकारच्या धान्यांचा समावेश होतो.  हे उपसहारा आफ्रिका आणि आशियातील लाखो लोकांसाठी पोषणाचे महत्वाचे स्त्रोत आहेत. ते स्थानिक  नागरिकांची संस्कृती, रीतिरिवाज आणि परंपरांमध्ये खोलवर रुजलेले असून ते सांस्कृतिक दृष्टीने संबंधित असलेल्या प्रदेशात ते अन्न सुरक्षिततेची हमी देण्यास मदत करतात.

     भरड धान्ये ही खूप पौष्टिक असतात कारण त्यात ॲटीऑक्सिडंट्स, खनिजे आणि प्रथिने असतात. संपूर्ण धान्य म्हणून भरड धान्यांच्या प्रत्येक जातीमध्ये विशिष्ट प्रकारचे आणि विशिष्ट प्रमाणात फायबर असते जे आतड्यांमधील कामकाज, रक्तातील शर्करा आणि लिपीड यांचे योग्य नियमन करण्यास मदत करतात.

     यूपीएलचे ग्लोबल कॉर्पोरेट आणि इंडस्ट्री अफेअर्सचे अध्यक्ष श्री. सागर कौशिक म्हणाले, “घानामध्ये भरड धान्यांच्या लागवडीच्या संभाव्यतेचा अभ्यास करणारा  लॅटिन अमेरिकेतील पहिला देश म्हणून रिपब्लिक ऑफ घानासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल.”

     या उपक्रमांबद्दल अधिक सांगताना श्री. कौशिक म्हणाले, “यूपीएल भरड धान्यांच्या लागवडीसाठी एक नवीन मार्ग उपलब्ध करून देत आहे आणि या सहभागीदारीमार्फत ‘अन्न-सुरक्षित जग’ या लक्ष्याकडे महत्त्वाची वाटचाल करीत आहे.  घाना आणि यूपीएल या दोघांसाठी ही फायद्याचीच परिस्थिती आहे. या उपक्रमाच्या यशाची खात्री करण्यासाठी यूपीएलचे कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल, ज्यामुळे जागतिक स्तरावरील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध होऊ शकेल. आम्ही या सहभागीदारीच्या क्षमतेबद्दल व संभाव्यतेबद्दल उत्साही आहोत आणि शाश्वत कृषी पद्धतींना चालना देण्याचे आमचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रिपब्लिक ऑफ घानासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”