पुणे : “चित्रपटांतील गीत आणि संगीतामुळेच चित्रपटांचे जग लोकप्रिय झाले, तसेच बदलत्या काळातही ते टिकून राहिले. चित्रपट सृष्टीचा हा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत आठवणी आणि नोंदीच्या स्वरूपात पोहोचवायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी यांनी केले.
हिंदी चित्रपट संगीतातील १८० पेक्षा अधिक गायकांवर स्वप्नील पोरे लिखित ‘स्वरसागर’ संदर्भग्रंथावर चर्चासत्र व गायन मैफलीवेळी रविप्रकाश कुलकर्णी बोलत होते. पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था (सातारा) यांच्या वतीने लक्ष्मी रोडवरील पूना गेस्ट हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते उल्हास पवार, समीक्षक प्रा. विश्वास वसेकर, लेखक स्वप्नील पोरे, साहित्यिक राजन लाखे, प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशी, ‘दीपलक्ष्मी’चे संस्थापक शिरीष चिटणीस, अजित कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर सरपोतदार होते.
रविप्रकाश कुलकर्णी म्हणाले, “चित्रपट क्षेत्राविषयी वाचायला अनेकांना आवडते. मात्र, हे लेखन ओघवत्या शैलीत असेल, तर वाचकांना ते अधिक भावते. पोरे यांनी ‘स्वरसागर’मधून गायक कलाकारांचा प्रवास रसरशीतपणे मांडला आहे. मराठीतील हा महत्वाचा संदर्भग्रंथ असून, त्याचे वाचन करताना चित्रपट सृष्टीची सफर घडते.”
उल्हास पवार म्हणाले, “चित्रपट संगीताच्या समृद्ध परंपरेचे नेमकेपणाने दर्शन घडविण्याचे काम ‘स्वरसागर’ ग्रंथातून झाले आहे. कलाकारांच्या आठवणी नोंदल्या जाव्यात आणि त्याद्वारे रसिकांना या कलाकारांची कारकीर्द समजून घेता यावी, यासाठी असे मौलिक लेखन व्हावे.”
प्रा. विश्वास वसेकर म्हणाले, “कला क्षेत्रातील व्यक्तींवरील लेखन ललित गद्याच्या शैलीत प्रभावी ठरते. ‘स्वरसागर’ ग्रंथातून हिंदी चित्रपट संगीतातील गायकांची सखोल माहिती मराठी वाचकांपुढे आली आहे.” किशोर सरपोतदार म्हणाले, “कलाकारांच्या योगदानाची योग्य नोंद गरजेची असून, हिंदीप्रमाणेच मराठीतील कलाकारांचे योगदान पुस्तकरूपात यावे.”
स्वप्नील पोरे यांनी ‘स्वरसागर’चा प्रवास उलगडला. शिरीष चिटणीस यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. मनीष गोखले यांनी सूत्रसंचालन केले. अजित कुमठेकर यांनी आभार मानले.
आठवणी, गाण्यांना श्रोत्यांची दाद
वक्त्यांनी दिग्गज गायक कलाकारांच्या सांगितलेल्या आठवणी व कलाकारांनी गायलेली सदाबहार गाणी यामुळे कार्यक्रमात रंगत आली. हेमंत वाळुंजकर, दत्ता थिटे, संजय मरळ, हेमंत खणंग, पल्लवी पाठक, मनाली राजे, आरती कवठेकर, वैजू चांडवले या कलाकारांनी अनेक लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले. गायक कलाकारांच्या आठवणी व गाण्यांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.