कलर्सवरील खतरों के खिलाडी 13 मधील स्पर्धक शिव ठाकरे म्हणतो, “बाप्पाशी माझे काय नाते आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. मी बाप्पाचा भक्त आहे आणि बाप्पा माझा ऊर्जा स्रोत आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मी बाप्पाचे आशीर्वाद घेतल्याशिवाय करत नाही. खतरों के खिलाडी 13 मध्ये दाखल होण्याअगोदर देखील मी सिद्धीविनायक मंदिरात गेलो होतो. समस्त जनतेला गणेश चतुर्थी साजरी करताना, रस्त्यावर धुंद होऊन नाचताना पाहून मला आनंद वाटतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी माझी आई वरण भात, उकडीचे मोदक वगैरे खास मराठमोळा बेत करते. आणि हा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी आपले सगळे नातलग आमच्याकडे येतात. बाप्पा आपणा सर्वांचे रक्षण करो आणि सगळी विघ्ने दूर करो. गणपती बाप्पा मोरया!”
कलर्सवरील सुहागन मालिकेत पायलची भूमिका करणारी साक्षी शर्मा म्हणते, “मी उत्तर भारतीय असल्याने सुहागनच्या सेट्सवर गणपती बाप्पाचे स्वागत करण्याच्या कल्पनेने मी फारच रोमांचित झाले आहे. यावेळी ईको-फ्रेंडली प्रथा पाळण्याचा निर्धार करून आम्ही सेटवर एक खास ईको-फ्रेंडली मूर्ती आणणार आहोत. त्याची तयारी जोरात सुरू आहे. माझ्या पडद्यावरील कुटुंबियांसोबत रुचकर पदार्थांवर ताव मारण्यासाठी मी आतुर झाले आहे. माझ्यातर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!”
कलर्सवरील परिणीती मालिकेत परिणीतची भूमिका करणारी आंचल साहू म्हणते, “मी मुंबईत मोठी झाले, त्यामुळे इथे गणेशोत्सव किती उत्साहाने आणि जोशात साजरा होतो हे मी पाहिले आहे. गणपती बाप्पाला समर्पित या 11 दिवसांत आमचे हे शहर सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाच्या चित्कारांनी दुमदुमून जाते. या वर्षी या सणाचे माझ्या लेखी विशेष महत्त्व आहे, कारण अनेक वर्षांनंतर यावर्षी आम्ही घरी गणपती बाप्पांना घेऊन येणार आहोत. बाप्पाची माझ्यावर नेहमीच कृपादृष्टी राहिली आहे.” मालिकेतील सध्याच्या कथानकाविषयी आंचल सांगते, “आमच्या परिणीती मालिकेत बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद यामुळे परीला अपेक्षित असलेले प्रेम आणि सन्मान राजीवकडून मिळाले आहे. मला आशा आहे की, प्रेक्षकांना आमची पडद्यावरची केमिस्ट्री आवडेल आणि ते आमच्यावर त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करतील.”
कलर्सवरील शिव शक्ति – तप त्याग तांडव मालिकेत भगवान विष्णुची भूमिका करणारा श्रीकांत द्विवेदी म्हणतो, “गणेशाच्या आगमनाच्या बऱ्याच अगोदरपासून गणेश चतुर्थीचा उत्साह सळसळू लागतो. मी अगदी लहान असल्यापासून माझ्या आईची गणेश भक्ती पाहिली आहे. आमच्या घरी दोन दिवस गणपतीचे वास्तव्य असे. लहानपणी भक्तिभावाने केलेली गणेशाची प्रार्थना अजूनही मला आठवते. हा सण साजरा करण्याची आपली पद्धत बदलली असली, तरी या मंगलमूर्तीविषयीचा आपल्या मनातील भक्तीभाव अजून तसाच आहे. या वर्षी मी माझ्या काही मित्रांकडे आरतीला जाणार आहे आणि उकडीच्या मोदकांसाठी तर मी फारच आतुर आहे.”
कलर्सवरील नीरजा.. एक नई पहचान मालिकेत प्रोतिमाची भूमिका करणारी स्नेहा वाघ म्हणते, “भगवान गणेशाचे स्तवन करून मला जी ऊर्जा मिळते, ती अद्वितीय असते. हा सण साजरा करण्यासाठी मी आणि माझे कुटुंबीय माझ्या काकांच्या घरी जातो. आमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार घरातील ज्येष्ठ मुलगाच गणपती घरी आणू शकतो. बाप्पाचे स्वागत करून त्याची पूजा करण्यासाठी आम्ही अगदी सज्ज असतो. या सणाचे मोठे आकर्षण म्हणजे या दिवसांत घरोघरी गोडधोड केले जाते, खास करून उकडीचे मोदक करतात.” मालिकेतील सध्याच्या कथानकाविषयी ती सांगते, “नीरजाला अखेरीस समजले आहे की तिची आई, प्रोतिमा एक सेक्सवर्कर आहे. प्रेक्षक आता नीरजा आणि प्रोतिमा यांच्यातील नात्याची गुंतागुंत बघतील. मला आशा आहे की, प्रेक्षकांना मालिकेतील हा ट्विस्ट आवडेल.”