गणेशोत्सव लेख भाग २

32

गणेशोत्सव  साजरा करणे आणि त्यातील शंका समाधान !

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥

याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.

श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांंचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. गणपति हा शब्द गण आणि पति या दोन शब्दांनी बनला आहे. गण याचा अर्थ पवित्रक. पति म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्‍या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.गणेशोत्सव काळात आपण मोठ्या भक्ती भावाने तो साजरा करतो. त्याची कृपा आपल्यावर होत असते. परंतु हे सर्व करत असताना काही कृती करताना येणाऱ्या शंका ,प्रश्न यांची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे ,वाचकांनी याचा जरूर लाभ करून घ्यावा . 

भाद्रपद शु. चतुर्थी अर्थात् गणेश चतुर्थी हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव ! श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर एक हजार पटीने कार्यरत असते.  या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

गणेशोत्सत्वात आरती अन् नामजप कसा करावा ? : गणेश चतुर्थीच्या काळात आरती म्हणणे म्हणजे कर्णकर्कश आवाजात ती म्हणणे, असे जणू समीकरणच झाले आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष भगवान श्री गणेशासमारे उभे आरती आपण आरती म्हणत आहोत असा भाव ठेवून भावपूर्ण आणि आर्ततेने आरती म्हटली पाहिजे. तर तिचा लाभ होतो. खूप आरत्या म्हणण्याऐवजी फक्त गणेशाची आरती म्हणावी. त्यानंतर त्या ठिकाणी बसून काही वेळ श्रीगणेशाच नामजप केल्यास अधिक प्रमाणात लाभ मिळतो. आरती ही सगुण, तर नामजप ही एकप्रकारे निर्गुण उपासना आहे. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो.

गणेशोत्सवात मूर्तीभंग झाल्यास काय करावे ? : ‘प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी वा विसर्जनापूर्वीच्या अक्षता टाकून त्या मूर्तीतील देवत्व गेल्यावर त्या मूर्तीचा अवयव तुटल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अवयव दुखावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. देवत्व गेल्यावर अवयव दुखावल्यास त्या मूर्तीचे नेहमीप्रमाणे विसर्जन करावे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अवयव दुखावला, तर त्या मूर्तीवर अक्षता टाकून विसर्जन करावे. जर ही घटना गणेश चतुर्थीच्या दिवशीच घडली, तर दुसरी मूर्ती पुजावी व दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी घडल्यास नवीन मूर्ती पुजण्याचे काहीच कारण नाही. मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास कुलपुरोहिताच्या सल्ल्याने यथावकाश ‘अद्भुत दर्शन शांती’ करावी. दीपपतन, दृषद्स्फुटन (पाटा फुटणे), आळवाला फूल येणे, मूर्ती भंग पावणे इत्यादी अद्भुते घडल्यास त्या कुटुंबात द्रव्यहानी, गंभीर आजार वा अपमृत्यू घडण्याची शक्यता असते; म्हणून वरील उपाय श्रद्धेने करावा.

गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात का करावे ?

अध्यात्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या काळात केलेल्या शास्त्रोक्त पूजाविधींमुळे मूर्तीत श्री गणपतीचे चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होते. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने हे चैतन्य पाण्याद्वारे सर्वदूर पसरते. पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने हे चैतन्य वातावरणाद्वारेही दूरपर्यंत पोहोचते.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने समाजातून, पर्यावरणवाद्यांकडून वा शासनाकडून विविध आवाहन करण्यात येते, अशा वेळी काय करावे हे समजत नाही, या संदर्भात काय करू शकतो हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात समजून घेऊया !

बाजारात शाडूची मूर्ती मिळणे कठीण आहे. अशा वेळी काय करावे ? :  सध्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती बाजारात मिळतात. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती धर्मशास्त्रसंमत नाही. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’मध्ये रज-तमप्रधान असल्याने त्यापासून बनवली मूर्तीमध्ये गणेशाची पवित्रके आकृष्ट होत नाही. श्री गणेशमूर्ती चिकणमाती किंवा शाडू माती यांपासून बनवावी, असा शास्त्रविधी आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त अन्य पदार्थांनी गणेशमूर्ती बनवणे योग्य नाही; मग अशा स्थितीत आपल्याकडे असणाऱ्या पर्यायांचा विचार करू शकतो. 

१. आपण घरीच चिकणमातीची ६-७ इंचाची गणेशमूर्ती बनवू शकतो.

२. मूर्ती बनवता येत नसेल तरआपल्या घरातील गणेशाची मूर्ती अथवा गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतात. हे पूजन करत असतांना पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी करू नये. ‘प्राणप्रतिष्ठा’ केलेली मूर्ती नंतर विसर्जित करावी लागते. यासाठी ही दक्षता घ्यावी.

शाडूची मूर्ती बनवतांना त्यात बी ठेवावे आणि नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी हे शास्त्रसंमत आहे का ? : असे करणे धर्मशास्त्रसंमत नाही. खरे तर हा धर्म न मानणार्‍या पर्यावरणवाद्यांचा, तसेच नवीन काही तरी करण्याच्या संकल्पना म्हणून अशी टूम काढली जाते. तुम्हाला वृक्षारोपण करायचे असेल, तर वर्षातील ३६५ दिवस तुम्ही कधीही करू शकता. पर्यावरणप्रेमासाठी धर्माचरणात परिवर्तन करायची काहीही आवश्यकता नाही.

अलीकडे कथित पर्यावरणप्रेमी कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचा पुरस्कार करतात. ती वापरणे योग्य आहे का ?

कागदी लगद्याच्या मूर्तीने किती प्रदूषण होते, हेही जाणणे आवश्यक आहे. १. मुंबईतील प्रसिद्ध ‘शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था’ (Institute of Chemical Tecnhology Mumbai) यांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या ४ मूर्ती घेऊन या विषयावर संशोधन केले. या संशोधनाअंती लक्ष्यात आले की, १० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅड्मियम, टायटॅनिअम ऑक्साईड, असे विषारी धातू आढळून आले. तसेच सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’, या संस्थेने साधा कागद ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ‘ऑक्सिजन’ची मात्रा शून्यावर आल्याचे त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाले. हे अत्यंत घातक आहे. वरील प्रयोगांवरून ‘कागदी लगदा किती हानीकारक आहे’, हे वैज्ञािनक स्तरावरही सिद्ध होते.’

गणेशमूर्तींच्या विसर्जनाने प्रदूषण होते, अशी ओरड केली जाते यात किती तथ्य आहे ? : गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता हे स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे. गणपतीच्या मूर्तीला लावण्यात येणार्‍या रंगांमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती तलाव, नद्या, खाड्या, समुद्र यांत विसर्जित न करता, कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याची किंवा त्या स्वयंघोषित संघटनांना दान देण्याची फॅशन चालू झाली. प्रत्यक्षात मात्र अशा मूर्तींचे पुढे काय होते, हे जाणण्याचा प्रयत्न कोणी करते का ? कि हिंदु समाज आता गणेशोत्सवच एक फॅशन म्हणून पार पाडत आहे ? मुळात येथे प्रश्न असा आहे की, गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने पाण्याचे प्रदूषण होते का ? या गोष्टीची कायदेशीर आणि विज्ञानाच्या निकषांवर निश्चिती करून घेण्याचा खटाटोप किती हिंदूंनी केला ? सहस्रो वर्षे चालणार्‍या गणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे कधी पर्यावरणाची हानी झाली नाही; पण विज्ञानाने केवळ १०० वर्षांत पर्यावरण नष्ट करत आणले आहे. इतकेच नव्हे, तर जलप्रदूषण होऊ नये; म्हणून शासनाने निर्माण केलेली व्यवस्था अस्तित्वहीन झाली आहे. ती चांगल्या रितीने चालावी, यासाठी जे शासकीय अधिकारी नेमले गेले आहेत, त्यांना कदाचित् त्यांच्या कर्तव्याविषयी माहितीही नाही.अशा वेळी 

गणपतीच्या मूर्तीचे दान देणे योग्य आहे ? : बरेच जण प्रदूषण होते म्हणून गणेशमूर्तीचे दान मागतात; पण आपण पूजलेली मूर्ती दान देणे योग्य नाही; कारण श्री गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधीच आहे. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; कारण देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही. श्री गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे, की जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली. श्री गणेशमूर्ती दान केल्यानंतर तिचे यथासांग विसर्जन होईल, याची शाश्वती नसते. दान केलेल्या मूर्ती कार्यकर्ते तेथेच टाकून जातात वा तिची विटंबना होण्याची शक्यता अधिक असते. 

वहात्या पाण्यात निर्माल्य-विसर्जन शक्य नसल्यास काय करावे ? : एरव्ही श्री गणेशमूर्तीच्या समवेत निर्माल्याचेही विसर्जन करायचे असते. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा समष्टी स्तरावर लाभ होतो. काही वेळा निर्माल्य पाण्यात विसर्जित करता येत नाही. अशा वेळी व्यष्टी स्तरावर तरी निर्माल्यातील चैतन्याचा लाभ मिळावा यासाठी निर्माल्य पाण्यात बुडवून काढावे आणि नंतर त्या पाण्याचा वापर स्नानासाठी करावा किंवा ते पाणी अंगणातील फुलझाडांना घालावे. नंतर त्या निर्माल्याचा वापर खत-निर्मितीसाठी करावा.

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करणे योग्य आहे का ? :‘प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे असे शास्त्र आहे. वहात्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे पूजेमुळे मूर्तीत आलेले चैतन्य पाण्यातून सर्वदूर पोहोचते. हौदातील पाणी वहाते नसल्यामुळे या आध्यात्मिक लाभापासून भाविक वंचित होतात. 

हौदात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पालिकेचे कर्मचारी गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यापूर्वीच ती हौदातून काढून बाहेर ठेवतात. असे करणे शास्त्राच्या विरोधात आहे.

हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती पालिकेच्या कचर्‍याच्या गाडीतून नेल्या जातात. तसेच पालिकेचे कर्मचारी मूर्ती कचर्‍याप्रमाणे फेकतात. बर्‍याच वेळा या मूर्ती खाणीतील घाण पाण्यात फेकतात.

गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पालिका हौद बुजवण्यापूर्वी त्यातील गणेशतत्त्वाने भारित झालेले पाणी गटारात सोडून देते. हीसुद्धा श्री गणेशाची विटंबनाच आहे.

दुष्काळग्रस्त भागात मूर्तीविसर्जन करण्यासाठी काय करू शकतो ? : अनेक ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे नद्या-ओहोळ आटतात. त्यामुळे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन शास्त्रानुसार वहात्या पाण्यात करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आपत्काळ ओढवला असतांना धार्मिक कृती अध्यात्मातील तत्त्वांनुसार केल्यास ती धर्मशास्त्राला संमतच असते. यानुसार दुष्काळी स्थितीत श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी पुढील पर्याय अवलंबा !

१. लहान मूर्ती बसवणे : अ. प्रतिवर्षी मोठी मूर्ती आणण्याचा प्रघात असला, तरी दुष्काळी परिस्थितीत विसर्जनासाठी सुसंगत होईल, अशा लहान (६-७ इंच उंच) मूर्तीची पूजा करावी.

आ. उत्तरपूजेनंतर ही मूर्ती घराबाहेर तुळशी वृंदावनाच्या जवळ किंवा अंगणात किंवा शहरात सदनिकांत वास्तव्य करणार्‍यांनी घरातच भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये विसर्जित करावी.

इ. मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रीतीने आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावी.

२. मोठी मूर्ती कालांतराने विसर्जित करणे : मोठी मूर्ती बसवण्याचा पर्याय स्वीकारल्यास त्या मूर्तीची उत्तरपूजा झाल्यावर ती घरातच सात्त्विक ठिकाणी (उदा. देवघराच्या शेजारी) ठेवावी. या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. धूळ बसू नये, यासाठी ती एखाद्या खोक्यात झाकून ठेवावी. पुढे वहाते पाणी उपलब्ध झाल्यानंतर ही मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करावी. वरील प्रकारचे विसर्जन केवळ अनावृष्टीसारख्या काळासाठी आपत्धर्म म्हणून संमत आहे.

प्रदूषित नदीत मूर्तीविसर्जन करणे योग्य आहे का ? : ‘गणेशमूर्तींचे नदीमध्ये वहात्या पाण्यात किंवा विहिरी, तलाव आदी नैसर्गिक जलाशयात विसर्जन करावे’, असे शास्त्र सांगते. नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने मूर्तीतील गणेशतत्त्व पाण्यासह सर्वदूर पसरून त्याचा चराचर सृष्टीला लाभ होतो. आता प्रश्न असा आहे की, नदी प्रदूषित असेल, तर काय करावे ? या प्रश्नाच्या उत्तराला २-३ पैलू आहेत. खरे तर नदीचे प्रदूषण रोखण्याचे मुख्य दायित्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे आहे. नदीचे मुख्य प्रदूषण प्राधान्याने त्यामध्ये मिसळले जाणारे दूषित रासायनिक पाणी, तसेच विनाप्रक्रिया सोडले जाणारे मैलापाणी यांमुळे होते. नदीचे प्रदूषण करणार्‍या घटकांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली, तर नदीची निर्मळता अबाधित राहू शकते; पण साधारण अनुभव असा आहे की, ९९ टक्के प्रदूषण करणार्‍या घटकांवर वर्षभरात कोणतेही ठोस उपाय काढले जात नाही; मात्र वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवामुळे प्रदूषण होत असल्याचे म्हणणे कितपत योग्य आहे. खरे तर प्रदूषण रोखण्यात स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे धार्मिक विधी पार पाडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनीच नदी प्रदूषणरहित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक ती पावले उचलावीत, विसर्जनाच्या दिवशी नदीला अधिक पाणी सोडावे, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा घ्यावा. 

     आता भाविकांच्या दृष्टीने विचार केला, तर आपल्या क्षेत्रात नदी अधिक प्रदूषित असेल, तर ज्या ठिकाणी नदीचे पाणी चांगले आहे, त्या ठिकाणी जाऊन गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. शास्त्रानुसार आचरण करण्यास प्राधान्य द्यावे.

सार्वजनिक गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करण्यासाठी हे करू शकतो: लोकमान्य टिळकांनी हिंदूंचे संघटन, राष्ट्ररक्षण, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रतिकार व धर्मजागृती या उद्देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; मात्र सध्या उत्सवात शिरलेल्या अनेक गैरप्रकारांमुळे उत्सवाची मूळ उद्दिष्टे तर दूरच राहिली, त्याबरोबर उत्सवाचे पावित्र्यही नष्ट झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे साजर्‍या केलेल्या उत्सवातून श्रीगणशाची आपल्यावर कृपा कशी होणार ? गणेशोत्सवामागील खरा उद्देश सार्थ ठरावा, यासाठी प्रथमत: गणेश मंडळांनी लोकांकडून ऐच्छिक वर्गणी स्वीकारावी, शाडू वा चिकणमाती यांपासून बनवलेली अन् नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती आणावी. नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची आरास करावी, तालबद्ध आरत्या आणि भावपूर्ण नामजप केला पाहिजे. तसेच राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा वाढवणार्‍या विषयांवरील देखाव्यांचे सादरीकरण करू शकतो. उत्सवस्थळी स्तोत्रपठण, राष्ट्र व धर्म या विषयांवरील व्याख्याने आदी ठेवू शकतो. तसेच रांगेतील भक्तांना गप्पागोष्टी टाळून नामजप/स्तोत्रपठण करण्यासाठी उद्युक्त करू शकतो. शेवटी विसर्जन मिरवणुकीत श्री गणपतीचा नामजप आणि भजने म्हणात, तसेच रात्री दहा पूर्वी तिची सांगता करावी. 

तसेच उत्सवाचे पावित्र्य टिकवण्यासाठी कोणत्या गाष्टी टाळायला हव्यात?

धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने देवतेचे तत्त्व अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करून तिची कृपा संपादन करणे, स्वतःतील, तसेच समाजातील सत्त्वगुण वाढवून व्यक्ती आणि समाज या दोहोंचे लौकिक व पारमार्थिक कल्याण साधणे, हा धार्मिक उत्सव साजरा करण्यामागील खरा व मूळ उद्देश आहे; मात्र गणेशोत्सवांत शास्त्रविसंगत अशा चित्रविचित्र आकारातील व पेहेरावातील देवतांच्या मूर्ती बसवणे; मंडपात मद्यपान, जुगार, हिडीस नृत्य, महिलांची छेडछाड करणे यांसारखी गैरकृत्ये करणे; जुगार, मद्यपान, गुटख्यांच्या जाहिराती मंडपात लावणे, संस्कृतीहीन असे चित्रपट, वाद्यवृंद यांसारखे रज-तमात्मक कार्यक्रम आयोजित करून उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. याचबरोबर उत्सवाच्या नावाखाली होणारे ध्वनीप्रदूषण; मंडपसजावट, विद्युतरोषणाई यांसाठी होणारा अवाढव्य खर्च, तसेच मूर्तीविसर्जनाच्या वेळी मिरवणुकांमध्ये होणारे गैरप्रकार या बाबीही समाजहिताच्या दृष्टीने घातक आहेत. या सर्व गोष्टी टाळायला हव्यात. 

– संकलन : श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था, संपर्क :7775858387