केक कापून श्रीशनीदेवाचा वाढदिवस साजरी करण्याची अशास्त्रीय पाश्चात्य प्रथा बंद करा – महाराष्ट्र मंदिर महासंघ

85

श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्चर हे जागृत देवस्थान आहे. भारतासह विदेशातील भाविकही शनीदेवाच्या दर्शनासाठी येथे मोठ्या श्रद्धेने येतात; मात्र मागील 3-4 वर्षांपासून काही भाविकांनी श्री शनीदेवाच्या ठिकाणी पाश्चात्त्यांप्रमाणे केक कापून देवाचा वाढदिवस साजरा करण्याची अशास्त्रीय कुप्रथा चालू केली. धर्मशास्त्रानुसार कोणताही शास्त्रीय आधार नसतांना, तसेच देवस्थानच्या लिखित घटनेतही उल्लेख नसतांना देवतेच्या ठिकाणी पाश्चत्त्यांप्रमाणे केक कापण्याचा प्रकार कशासाठी केला जात आहे ? धर्मशास्त्राला आणि हिंदु संस्कृतीला धरून नसलेल्या या पाश्चात्त्य प्रथेला देवस्थानने प्रतिबंध करावा, अशी मागणी आज ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आली आहे.
याविषयीचे निवेदन श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन शेटे यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. मंदिर महासंघाच्या वतीने सर्वश्री रामेश्वर भुकन, गोरख भराडे, सतीश वावरे, किरण बानकर, ज्ञानेश्वर जमदाडे आणि सागर खामकर उपस्थित होते. या वेळी ‘असे प्रकार होऊ नयेत म्हणून देवस्थानच्या वतीने योग्य ती काळजी घेण्यात येईल’, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेटे यांनी शिष्टमंडळाला दिले.
हिंदु धर्मशास्त्रानुसार देवतेच्या जन्मदिनी विविध धार्मिक विधी प्रथा-परंपरेनुसार साजरे केले जातात. अशा वेळी यात्रा आणि उत्सव यांचे आयोजन केले जाते. त्याचा लाभ सर्व भाविकांना होतो. यासाठी मंदिरात येणार्‍या भाविकांनी येथे येऊन देवतेची श्रद्धेने आराधना करणे अपेक्षित आहे. भावभक्तीने आराधना करणार्‍यांनाच देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. ‘केक कापणे’ ही पाश्चात्त्य परंपरा आहे. ‘मौजमजा’ या व्यतिरिक्त यामागे कोणताही हेतू नाही. आध्यात्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी अशा पाश्चात्त्य कृती करणे म्हणजे तेथील धार्मिक वातावरणावर परिणाम करणार्‍या आहेत. भारतातीत बहुतांश देवालयांमध्ये तेथील देवतांचा जन्मोत्सव वा जयंती साजरी केली जाते; मात्र कोठेही केक कापण्यासारखी कृती केली जात नाही. त्यामुळे श्री शनैश्चर देवस्थान समितीने देवाच्या जन्मदिनी केक कापण्याची ही पाश्चात्य प्रथा तात्काळ बंद करावी.
हिंदूंच्या मंदिराच्या ठिकाणी चालणारे असे अशास्त्रीय प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. हे प्रकार थांबले नाहीत, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने हिंदू रस्त्यावर उतरेल. श्री शनीदेवाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मंदिरात केक कापणार्‍यांना योग्य ती समज द्यावी. हा अशास्त्रीय प्रकार वेळी रोखून श्री शनैश्चर देवस्थानच्या ठिकाणचे पावित्र्य टिकवून ठेवायला हवे, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समनव्यक श्री. सुनील घनवट यांनी केले.