पुणे : कुटुंबवत्सल, नात्यांची घट्ट वीण दर्शवणारी ‘असीमांत रेखा’ स्त्रीच्या शरीरापेक्षा तिच्या मनावर, त्यागावर प्रेम करायला हवे. भारतीय कुटुंबव्यवस्था कुटुंबवत्सल आणि नात्यांची गुंतागुंत असलेली आहे. या नात्याची घट्ट वीण आणि वात्सल्य दर्शवणारी ‘असीमांत रेखा’ मनाला भिडते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
वेदांत प्रकाशन प्रकाशित व महेश सावळे लिखित ‘असीमांत रेखा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध लेखक श्रीकांत चौगुले, प्रकाशिका सुनिताराजे पवार, लेखक महेश सावळे, पत्नी रेखा, मुलगा अनुप, स्नुषा डॉ. पारुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,” महात्मा गांधींजींचे सत्य, अहिंसा ही तत्वे सुखी संसाराची बीजे आहेत. प्रेम, विश्वासाने संसार अधिक फुलतो, बहरतो. सावळे दाम्पत्याने हेच सुञ अवलंबल्याने त्यांच्या संसाराचा हा रथ अधिक जोमाने पुढे सरकत आहे. समर्पण, सहनशीलता, प्रेम अशा विविध पैलुंचे दर्शन या पुस्तकात घडते. स्त्री कर्तृत्वाचा आणि सांसारिक वाटचालीचा छत्तीस वर्षाचा हा प्रवास उत्तम पद्धतीने मांडला आहे.”
महेश सावळे म्हणाले, “समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. सांसारिक सहजीवनाची छत्तीस वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पत्नीचा वेगळेपणा, तिची आपुलकी, तिचा प्रेमळ सहवास आणि तिच्या अस्तित्वाचा परिघ शब्दबद्ध करण्यासाठी, तसेच पत्नीच्या नात्याप्रती ऋणनिर्देश म्हणून ‘असीमांत रेखा’ हे पुस्तक रेखाटले.”
सुनिताराजे पवार म्हणाल्या, “स्त्रीचे आयुष्य एखाद्या नदीप्रमाणे असते. ती जेव्हा शांत असते, तेव्हा सर्वांना आपुलकीने सामावून घेत तिचा प्रवाह सुरू असतो. माञ जेव्हा ती आक्रमक होते, तेव्हा महापुर येतो आणि संहार होतो. ‘असीमांत रेखा’ या पुस्तकात लेखकाने त्यांच्या पत्नीच्या कर्तृत्वाची गौरवगाथा समर्पक शब्दात मांडली आहे. निश्चितच या प्रेरक साहित्यकृतीचे वाचक स्वागत करतील. लोकांना सोपी वाटणारी गृहिणीची भुमिका ही अवघड असते.”
श्रीकांत चौगुले म्हणाले, “वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीला धरून लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक घरातील कथा वाटावी अशी आहे. पुस्तकातील त्याग, सर्मपणाची भावना प्रेरणा देणारी आहे.” प्रास्ताविक डॉ. पारुल सावळे यांनी केले. सूत्रसंचालन रुपाली अवचरे यांनी केले. आभार अनुप सावळे यांनी मानले.