कलबाग ते कलाबाज ‘आऊ ‘ उषा नाडकर्णी यांनी नवोदित कलाकारांना दिला यशाचा कानमंत्र

128

पुणे, २७ नोव्हेंबर २०२२ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्नित ‘मराठी नाट्य कलाकार संघा’ च्या वतीने २०१४ सालापासून जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. रंगभूमीवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सक्रिय रंगकर्मींचाही हक्काचा एक दिवस असावा, या उद्दिष्टाने ज्यांनी रंगभूमीवर सर्वस्व वाहिले आहे, अशा भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा ‘जागतिक रंगकर्मी दिन’ म्हणून   साजरा केला जातो.

या निमित्ताने एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मींचा सत्कार करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात येते.
जागतिक रंगकर्मी दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री आणि सर्वांच्या लाडक्या “आऊ” श्रीमती उषा नाडकर्णी यांचा दामोदर नाट्यगृह, परळ येथे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. स्मिता गवाणकर यांनी घेतलेल्या दिलखुलास  मुलाखतीतून ‘आऊं’ एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून आणखी उलगडत गेल्या.

‘ज्योतीने ज्योत उजळावी’! तसं मला कामानं काम मिळत गेलं. माझ्या या वेगवान प्रवासात मला सारखं वाटायचं., नव्हे अजूनही वाटतं तुम्ही सगळेजण माझ्या कामाचं कौतुक करता; पण मी कुठे चुकतेय? हे मला कधीच सांगितलं नाही. ते ही सांगायला पाहिजे नं! तो तुमचा अधिकार आहे”, असं उषा नाडकर्णी आपल्या रसिक प्रेक्षकांना उद्देशून म्हणाल्या.

या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या कलाकारांना माझा हात जोडून संदेश आहे. “नुसता नट्टापट्टा करू नका. काम करा!… मनापासून काम करा! मला काय करायचंय ते आधी लक्षात घ्या! माझं काम काय?… या भूमिकेत माझं वय काय? हे समजून मनापासून काम करा. कामाचा आनंद घ्या. प्रामाणिकपणे श्रद्धेनं काम करा. आणि एक कळकळीची विनंती. “आपल्या भाषेवर प्रेम करा. भाषेच्या बाराखडी चा सराव करा. शब्दरचना… शब्दांचे उच्चार… वाक्याची रचना समजून घ्या. म्हणजे तुमच्या चांगल्या कामाबरोबरच तुमचं बोलणं देखील लोकांना आवडेल. आणि मग प्रेक्षक तुमचं कौतुक करू लागतील!” यशस्वी व्हाल… लक्षात ठेवा बरं! असा यशाचा कानमंत्र त्यांनी नवोदित कलाकारांना दिला.

‘उषा कलबाग’ ते ‘उषा नाडकर्णी’ (आऊ)च्या यशस्वी प्रवासातले अनेक किस्से त्यांनी सांगितले.
मराठी नाट्य कलाकार संघाच्या वतीने यावेळी १४ ज्येष्ठ कलाकारांना ‘कलाकार आर्थिक सहाय्य योजने’ अंतर्गत धनादेश वाटप करण्यात आले.

मराठी नाट्य कलाकार संघाचा अध्यक्ष या नात्याने आजचा हा रंगकर्मी दिन सोहळा साजरा करताना विशेष अभिमान वाटतोय. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या खऱ्या कलावंतांचा हा दिवस. कोविड काळातील कलाकारांचा संघर्ष लक्षात घेता कलाकारांची एकजुटता असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दृष्टीने कलाकार आर्थिक सहाय्य योजना या मराठी कलाकार संघाने सुरू केली. कलाकारांनी कलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. – सुशांत शेलार, अध्यक्ष- मराठी नाट्य कलाकार संघ कलाकार म्हणजे फक्त अभिनय करणारे कलाकार नसून पडद्यामागील सर्व कलाकारांचा हा जागतिक रंगकर्मी दिन आहे. त्यामुळे आम्हा सर्व कलाकारांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे – उपाध्यक्ष शरद पोक्षे

यावेळी प्रदीप कबरे, अभिनेत्री क्रांती रेडकर, उमा बापट, विजय सूर्यवंशी, शिवाजी शिंदे, सुनीता गोरे, सावित्री हेगडे, आशा ज्ञाते, लीना नांदगावकर, अर्चना नेवरेकर, सागर जैन, यतीन यादव आदी सदस्य मंडळी उपस्थित होते. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला.