पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (एसआयएफटी) आयोजित ‘ल क्लासे रनवे शो-२०२३’मधून आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून होत असलेला हा वार्षिक फॅशन शो बुधवार, दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये होणार आहे, अशी माहिती ‘एसआयएफटी’च्या उपप्राचार्य रेणुका घोसपुरकर यांनी दिली.
रेणुका घोसपुरकर म्हणाल्या, “सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन यंदा रौप्य महोत्सव साजरा करत असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या फॅशन शोचे आयोजन केले आहे. ‘सूर्यदत्त’मध्ये फॅशन टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्लॅमरस दुनियेची ओळख व्हावी, त्यांनी तयार केलेल्या कलात्मक कपड्यांना प्रदर्शित करण्याचे व्यासपीठ मिळावे, यासाठी दरवर्षी फॅशन शोचे आयोजन केले जाते. प्रसिद्ध मॉडेल्स विद्यार्थ्यांनी बनवलेले कपडे परिधान करून रॅम्पवॉक करतात.”
“यंदाच्या फॅशन शोची संकल्पना आदिवासी लोकसंस्कृती अशी आहे. भारतीय जमाती व आदिवासी संस्कृतीचा भूत, वर्तमान व भविष्य असा प्रवास दर्शवणाऱ्या पारंपरिक व आधुनिक पोषाखांची निर्मिती केली आहे. ‘ल क्लासे रनवे शो’ मुळे विद्यार्थ्यांना भारतीय कापड व अलंकारांच्या जुन्या तंत्राचा प्रचार करण्याची संधी मिळाली आहे. वैविध्याने परिपूर्ण संस्कृती व मोठा वारसा लाभलेल्या आपल्या भारतात अनेक जमाती, भाषा, संस्कृती, लोककला आहे. प्रांतागणिक बदलणारे वैशिष्ट्यपूर्ण पेहराव, अलंकार पाहायला मिळतात. याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या शो मधून होणार आहे,” असे रेणुका घोसपुरकर यांनी नमूद केले.
नागालँड मधील अंगामी नागा जमात, राजस्थानातील भिल्ल जमात, हिमाचल प्रदेशमधील थारली किन्नौरी जमात, ईशान्येकडील खासी जमात, मेघालयातील बोडो जमात, महाराष्ट्रातील बंजारा जमातीसह इतर राज्यातील काही आदिवासी जमातींच्या लोक संस्कृती अनुभवता येणार आहेत. प्रेक्षकांना अनेक कलाकारांना रॅम्पवॉक करताना पाहण्याची संधी मिळणार आहे. फॅशन कोरियोग्राफर संदीप धर्माँ यांनी कोरियोग्राफी केली आहे. ग्लोबल फॅशन डिझायनर संदेश नवलखा, मिसेस ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन अमेरिका डॉ. नमिता कोहोक व यंग माइंड्स एज्युकेशनच्या संस्थापिका अवंतिका खत्री ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. मुंबईतील कंन्डिस पिंटो, दीप्ती गुजराल यांच्यासह १२ पेक्षा अधिक मॉडेल्स आपल्या अदाकारीने लक्ष वेधणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.